ग्रामीण महाराष्ट्राला करोनाचा धोका कायम

२१ जिल्ह्य़ांत बाधितांच्या संख्येत वाढ

करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे गेल्या काही दिवसांपासून १५ जिल्ह्य़ांत करोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. ही राज्यासाठी दिलासादायक बाब असली तरी ग्रामीण भागातील २१ जिल्ह्य़ांत अजूनही करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करतानाच लसीकरणाला प्राधान्य देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असून १८ लाख लसींची मागणी नोंदविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात लसीकरणाला वेग देण्याचा प्रयत्न आहे. मात्र लसींचा पुरवठा आवश्यक असून लस नसल्याने राज्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत.

हे वाचले का?  Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

आज राज्यात कोविशिल्डच्या ९ लाख मात्रा प्राप्त झाल्या. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. आतापर्यंत ४५ वर्षेवरील एक कोटी ४५ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून हे प्रमाण ४५ टक्के आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सीरमकडे १ लाख ८१ हजार आणि भारत बायोटिककडे चार लाख ७९ हजार अशा सुमारे १८ लाख मात्रांची खरेदी आदेश देण्यात आले आहेत.

तसेच स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू आहे. ते निश्चित झाल्यानंतर त्याचीही खरेदी के ली जाईल अशी माहिती टोपे यांनी दिली.

सरकारने रेमडेसिविर, प्राणवायू यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. या निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसिविर, २० हजार प्राणवायू कॉन्स्ट्रेटर, २७  प्राणवायू साठवणूक टाक्या उपलब्ध होतील. मदत व पुनर्वसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती येत्या एक दोन दिवसात या खरेदीबाबतचा निर्णय घेईल आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल असेही टोपे यांनी सांगितले. तसेच प्राणवायूच्या बाबतीत राज्य स्वंयपूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे १५० प्रकल्प उभारले जात आहेत. जिल्ह्य़ांमध्ये प्राणवायू निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुर्नवसन निधी यामधून निधी घेण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचले का?  राज्यातील ‘या’ प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले, आता ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ म्हणून ओळखले जाणार

१५ जिल्ह्य़ांमध्ये करोना रुग्णसंख्येत घट

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे मुंबई, मुंबई उपनगरसह, ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, धुळे, भंडारा, लातूर, नंदुरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती,  उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्य़ांमधील दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह उर्वरित २१ जिल्ह्य़ांत बाधितांचा आकडा वाढत असून ही चिंतेची बाब आहे.