घटत्या तापमानाने द्राक्ष उत्पादकांवर चिंतेचे सावट

हंगामातील नवीन नीचांक; पारा ८.२ अंशावर

हंगामातील नवीन नीचांक; पारा ८.२ अंशावर

नाशिक : शहर, परिसरात थंडीने चांगलाच मुक्काम ठोकला असून दिवसागणिक तापमान कमी होत असल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. बुधवारी तापमान आणखी कमी होऊन ८.२ अंश या नवीन नीचांकी पातळीवर पोहोचले. कमालीच्या गारठय़ामुळे रात्री दव पडते. त्यामुळे भुरीचा प्रादुर्भाव होऊन मण्यांना तडे जाणे, रोपांची वाढ खुंटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. द्राक्ष बागेतील तापमान कायम राखणे, रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषधे मारावी लागतील. परिणामी, उत्पादन खर्च वाढणार असल्याची प्रतिक्रिया द्राक्ष उत्पादकांमधून उमटत आहे.

मध्यंतरी अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, धुक्याची दुलई यामध्ये गायब झालेल्या थंडीचे जोरदार पुनरागमन झाले आहे. तीन दिवसांपासून तापमान सातत्याने कमी होत असल्याने शहर, परिसरात थंडीची लाट आल्याची स्थिती आहे. केवळ रात्रीच नव्हे तर, दिवसाही कमालीचा गारवा जाणवतो. हवामानशास्त्र विभागाने बुधवारी ८.२ अंश ही हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाल्याचे सांगितले. तीन दिवसांपासून नवीन नीचांकी तापमान गाठले जात आहे. शहरासह ग्रामीण भागात थंडीचा तडाखा अधिक आहे.

बचावासाठी उबदार कपडे परिधान करणे क्रमप्राप्त ठरले. ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटविल्या जात असल्याचे दिसून येते. उत्तरेकडे शीतलहर पसरली आहे. तेथील वातावरणाचा प्रभाव नाशिकच्या तापमानावर पडतो. दरवर्षी डिसेंबर, जानेवारीत तापमान नीचांकी पातळीची नोंद करते. मागील हंगामात ६.५ तर २०१८ वर्षांच्या हंगामात ५.१ अंश तापमानाची नोंद झाली होती. ही पातळी यंदा गाठली जाते काय, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

पारा घसरत असल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि गारव्यामुळे सटाणा तालुक्यात सुमारे ६०० हेक्टरवरील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते.

घटत्या तापमानाने द्राक्ष मण्यांना तडे जाणे, पाने-मुळांचे काम मंदावणे असे प्रकार वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रात्रीच्या सुमारास दव पडते. त्यामुळे भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. बदलत्या वातावरणामुळे जास्तीच्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. त्याचा आर्थिक भार सहन करावा लागणार असल्याचे उत्पादक सांगतात.