“घराघरांत ड्रग्स पोचतंय, १०० विद्यार्थ्यांच्या आत्महत्या…”, ‘उडता नाशिक’चा उल्लेख करत राऊतांचा गंभीर आरोप

एमडी, अनेक प्रकारचे ड्रग्स नाशिकमध्ये येत आहेत. कुत्ता गोली नावाचा प्रकार नाशिकमध्ये येतोय. शेती, घर-दारे विकून जुगाराला लावले जात आहेत. अनेक गावे, गल्ल्या ड्रग्स रॅकेटच्या विळख्यात सापडले आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्स तस्कर ललित पाटील नाशिक जिल्ह्याचा आहे. ललित पाटीलला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि रुग्णालयातून पळून जाण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मदत केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. तसंच, नाशिकला ड्रग्सचा विळखा पडला असल्याचेही वृत्त समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यात असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील अंमली पदार्थांविषयी महत्त्वाची माहिती दिली असून सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत.

नाशिक बनलंय ड्रग्स माफियांचा अड्डा

“नाशिकचं नाव ज्या विषयात गाजतंय ते नाशिकच्या संस्कृतीला शोभणारं नाही. गेले काही दिवस ड्रग्स माफिया आणि नाशिकचं नाव समोर आलं आहे. गेल्या वर्षभरापासून नाशिक गुन्हेगारांचा आणि ड्रग्समाफियांचा प्रमुख अड्डा बनला आहे. पंजाब आणि गुजरातनंतर उडतं नाशिक होतंय की काय अशी परिस्थिती आहे. पंजाबमध्ये ज्याप्रकारे ड्रग्सचे व्यवहार पाहिले, तेव्हा उडता पंजाब असं नाव दिलं गेलं. तर, गेल्या दोन वर्षांपासून गुजरातमध्ये ड्रग्सचे व्यवहार सुरू आहेत. बंदरांवर आणि विमानतळांवर हजारो एमडी ड्रग्स पकडले गेले. काही माल सुटला गेला. अख्ख्या गुजरातमध्ये ड्रग्सचं थैमान आहे. त्यातील बरचसं ड्रग नाशिकला येतं. सुरत, इंदुरमार्गे नाशिकला येतं. नाशिक ड्रग्स रॅकेटियर्स आणि अनेक गुंडांचा मोठा अड्डा होताना दिसतोय आणि त्याला राजकीय आश्रय आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

हे वाचले का?  नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी ५५ टीएमसीहून अधिक पाणी; पाणी वाटप संघर्ष टळला

अंमली पदार्थांच्या नशेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

“शाळा, कॉलेज, अनेक शैक्षणिक संस्थांना ड्रग्सचा विळखा पडला आहे. विविध मार्गांनी विद्यार्थी आणि विद्यार्थींना ड्रग्सचा पुरवठा केला जातोय. पालक अस्वस्थ आहेत. गेल्या सहा महिन्यांत २० ते ३५ वयोगटातील १०० च्या आसपास विद्यार्थी आणि तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. ७५ टक्के विद्यार्थ्यांच्या पोस्टमार्टममधून सि्दध झालंय की अंमली पदार्थाच्या सेवनाने त्यांनी आत्महत्या केली आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना पालकमंत्री जबाबदार

“एमडी, अनेक प्रकारचे ड्रग्स नाशिकमध्ये येत आहेत. कुत्ता गोली नावाचा प्रकार नाशिकमध्ये येतोय. शेती, घर-दारे विकून जुगाराला लावले जात आहेत. अनेक गावे, गल्ल्या ड्रग्स रॅकेटच्या विळख्यात सापडले आहेत. नाशिकच्या एका गावात कोट्यवधीचा ड्रग्ससाठा उद्ध्वस्त केला गेला. त्यांना आश्रय कोणाचा आहे? पोलीस काय करत आहे? पोलीससुद्धा या ड्रग्स प्रकरणात सामील आहेत? त्यांच्या सहकार्याशिवाय इतकं मोठं रॅकेट तयार होऊच शकत नाही. ती छोटी भाभी कोण आहे? तिला कोण पोसतंय? ललित पाटील, भूषण पाटील यांना सोडून द्या. त्यांचे मायबाप जगासमोर आले आहेत. पण, नशा आणि ऑनलाईन गेम यामुळे किती जणांच्या हत्या आणि आत्महत्या झाल्या आहेत, याला जबाबदार कोण? नाशिकचे सध्याचे पालकमंत्री आणि उद्या ज्यांना पालकमंत्री व्हायचं आहे हे दोन्ही नेते या नाशिकच्या अधोगतीला जबाबदार आहेत”, असा आरोपही राऊतांनी केला.

हे वाचले का?  Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

ड्रग्स रॅकेटविरोधात ठाकरे गटाकडून आंदोलनाची हाक

“घराघरात ड्रग्स पोचतंय. तरुण मुलं, विद्यार्थी, शाळा, कॉलेज, पानटपऱ्या, लहान दुकाने इथून ड्रग्सचा व्यवहार आणि व्यवसाय सुरू असेल आणि पिढी बरबाद होत असेल तर शासकीय यंत्रणा पालकमंत्री, मंत्री, आमदार, पोलीस सहभागी असतील तर शिवसेना स्वस्थ बसू शकत नाही. यासंदर्भात उद्धव ठाकरेंसह चर्चा झाली आहे. नाशिकला ड्रग्सचा विळखा पडला आहे, गुन्हेगारीचा विळखा पडला आहे, त्याविरोधात शिवसेनेने मोठं आंदोलन हाती घ्यायचं ठरवलं आहे. २० तारखेला शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा निघेल. हा मोर्चा फक्त शिवसेनेचा नाही. या जिल्ह्यातील शहरातील नागरीक आणि पालकांनी या मोर्चात सहभागी होऊन निषेध व्यक्त करावा. हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचं असेल त्यांनी सहभागी व्हावं. पण, नेतृत्त्व शिवसेना करणार. हा आमचा इशारा मोर्चा आहे. हा एक इशारा आहे. जे या ड्रग्स माफियांना, गुंडाना पोसत आहेत, त्यांना हा इशारा आहे. राजकारणात, प्रशासनात कुठे कुठे हप्ते जात आहेत, याची सगळी यादी आमच्याकडे आहे, ते आम्ही जाहीर करू. त्यांच्या घरांत धाडी मारू”, असंही संजय राऊत म्हणाले.

…तर कायदा सुव्यवस्था बिघडल्यास बोंब मारू नका

“राजकारणात मतभेद होतात, निवडणुका येतात आणि जातात, पण हा प्रश्न निवडणूक आणि राजकारणाचा नाही. नाशिक शहर उद्ध्वस्त होणार असेल, तरुण पिढी उद्ध्वस्त होणार असेल शिवेसना असे अड्डे उद्ध्वस्त करेल. वेळप्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जातील, मग ते मंत्री असो वा त्यांचे बाप असतील. वेळ पडली तर नाशिक बंद करण्याची वेळ आली तरी करू. पण, सुरुवात मोर्चाने होईल. मोर्चा मोठा निघेल. पोलीस आयुक्त, या शहराचे पालकंत्री, माजी पालकमंत्री, इच्छुक पालकमंत्री, ज्यांनी या गुंड टोळ्यांना पोसलंय, ड्रग्स माफिया, रॅकेटियर्स, गुंड त्यांच्यासोबत फिरत आहेत. या गुंडगिरीचा बिमोड करण्याची जबाबदारी शिवसनेने घेतली तर कायदा आणि सुव्यवस्था मोडण्याची बोंब मारण्याचा नैतिक अधिकार नाही”, असंही ते म्हणाले.

हे वाचले का?  RTE Admission 2024: पहिल्या सोडतीनंतर तीन हजाराहून अधिक जागा रिक्त – सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

नाशिकचं नागपूर होऊ देणार नाही

“सुप्रिया सुळे म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा नागपुरातील गुन्हेगारी वाढते. पण त्यांनी अर्धसत्यच सांगितलं. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढते. सरळसरळ गुंडांना पाठिशी घातलं जातं. विरोधकांना त्रास दिला जातो. हे फक्त देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हाच होतं. नाशिकचं नागपूर होऊ देणार नाही. कारण या नाशिक शहारवर शिवसेनेचं प्रेम आहे, असंही राऊत म्हणाले.