चामर लेणीवर साकारणार ‘ऑक्सिजन पॉकेट’

नाशिक : वृक्ष लागवडीसह वनसंपदेच्या रक्षणार्थ अव्वल ठरणाऱ्या नाशिक विभागात पर्यावरण संवर्धनासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल टाकले जात असून, येत्या काही वर्षांत चामर लेणीच्या वनक्षेत्रात शहराचे ‘ऑक्सिजन पॉकेट’ तयार होणार आहे. त्यासाठी नगर वनोद्यानाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, या प्रकल्पात राज्याचा ८० टक्के, तर केंद्राचा २० टक्के सहभाग असेल. त्यामुळे वन विभागाला शहराजवळ समृद्ध वनसंपदा साकारणे शक्य होणार आहे.

केंद्र शासनाच्या पर्यावरण व हवामान मंत्रालयाची नगर वनोद्यान ही महत्त्वाकांक्षी योजना देशातील दोनशे शहरात राबविण्यात येणार असून, राज्यातील २६ शहरांमध्ये नाशिकचा समावेश आहे. नुकतेच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संदर्भात ऑनलाइन बैठक घेतली असून, राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी २६ शहरांची निवड त्यासाठी केली आहे. त्यामध्ये ११ शहरांचे नगर वनोद्यान, तर ४३ शाळांची रोपवाटिकेसाठीचे प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आले आहेत.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

शहरालगत असलेल्या वनक्षेत्रात २५ ते १०० हेक्टर क्षेत्रावर ही योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी एका शहराला वनोद्यानासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. त्यासाठी नाशिक वन विभागाने चामर लेणी वनक्षेत्र समृद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला असून, केंद्र शासनातर्फे त्याबाबत लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास शहरालगतच्या जागेत नव्याने देवराईप्रमाणे ऑक्सिजन पॉकेट तयार करणे सोयीस्कर होईल, असा आशावाद पश्चिम वन विभागाने व्यक्त केला. राज्यातल्या २२ शहरांत नाशिकचा समावेश झाल्याने नाशिकच्या प्रदूषणाची पातळी कमी करून हिरवाई वाढविण्याची ही नामी संधी वन विभागाला उपलब्ध झाली आहे. त्या अंतर्गत संबंधित क्षेत्र वनसंपदेने समृद्ध करण्यासह संरक्षक भिंत उभारण्यात येईल. या राखीव वन क्षेत्रात अधिकाधिक जैवविविधता वाढविण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.