चिमण्यांचे गाव ओळख मिळविण्यासाठी देवळावासीयांचा पुढाकार

वृक्षतोडीमुळे चिमण्यांची घरटी उद्ध्वस्त होत असून चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

‘घर तिथे घरटे’ उपक्रमाचा विस्तार, चिमण्यांची ५० घरटी बनवून नागरिकांना दिली

देवळा : सिमेंटचे वाढते जंगल आणि यंत्रांच्या खडखडाडात पक्ष्यांचे अस्तित्व विरळ होत चालले असतांना देवळा शहर हे ‘चिमण्यांचे गाव’ म्हणून ओळखले जावे, यासाठी शहरातील  चिमणीप्रेमी, चिमणीमित्र संस्थांच्या सहकार्याने ‘घर तिथे घरटे’ हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी हे चिमणीप्रेमी चिमण्यांच्या कृत्रिम घरट्यांची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

वृक्षतोडीमुळे चिमण्यांची घरटी उद्ध्वस्त होत असून चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. चिमण्यांना आसरा मिळवून दिल्यास त्यांना आधार मिळेल आणि त्यांची चिवचिव पुन्हा ऐकू  येईल, हे ध्यानी घेत येथील चिमणीप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते भारत कोठावदे तसेच इतर चिमणीमित्र नागरिकांनी मागील वर्षी ५० चिमण्यांची घरटी बनवून ती परिसरातील घरांच्या बाल्कनीत, कोपऱ्यात तसेच जिथे योग्य जागा असेल तिथे ठेवली.  रोज थोडेसे दाणा-पाणी ठेवत चिमण्यांना आश्रय दिल्याने या सर्वच घरट्यांमध्ये चिमण्यांचे वास्तव्य वाढू लागले आहे. चिमण्यांची घरटी सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे. मागील वर्षी आशापुरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ५० घरटी भेट दिली होती. चिमण्यांचा सुखद चिवचिवाट ऐकून या संस्थेमार्फत वर्धापन दिनानिमित्त पुन्हा १५१ घरट्यांचे वाटप केले जाणार आहे. याबरोबर अमृतकार पतसंस्था आणि इतरही काही संस्था चिमण्यांचे घरटे देण्यास उत्सुक आहेत. यामुळे लवकरच देवळा गावांत ‘घर तिथे घरटे‘ हा उपक्रम विस्तारत गावाची चिमण्यांचे गाव होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात विठेवाडी रोड तसेच शिवाजीनगर, विद्यानगर या उपनगरात घरट्यांचे वाटप करत या उपक्रमाचा प्रसार केला जाणार आहे.  दर महिन्यात याची व्याप्ती वाढविण्याचे नियोजन असल्याचे चिमणीप्रेमी भारत कोठावदे यांनी सांगितले.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

पर्यावरण संतुलनासाठी पक्षीसंवर्धन महत्त्वाचे आहे. या भागात चिमण्यांसाठी पूरक वातावरण असल्याने ‘थोडे दाणे-थोडे पाणी- वाचवूया चिमणी’ या अभियानास मिळालेला प्रतिसाद पाहता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. – भारत कोठावदे (देवळा)

लहान मुलांना ओळख होणारा पहिला पक्षी म्हणजे चिऊताई. बालगीतातही चिमणीचा मोठा वाटा आहे. प्रत्येक नागरिकाने घरोघरी घरटी बनवत चिमण्यांना आसरा द्यायला हवा.   – प्रा. कमल आहेर-कुं वर (देवळा)