चीनच्या आगळिकीवर भारताचं सडेतोड उत्तर; वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सहभागास नकार; खेळाडू विमानतळावरूनच माघारी!

चीननं अरुणाचल प्रदेशच्या काही खेळाडूंना स्टॅम्प्ड व्हिसाऐवजी स्टेपल्ड व्हिसा दिल्यानं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले आहेत!

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालीमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी त्यांच्यात सदिच्छा भेट झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, भेटीनंतर वर्षभरानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. एकीकडे या घडामोडी चालू असताना दुसरीकडे चीनची आगळीक चालूच असल्याचं पाहायला मिळत आहे. चीनच्या याच आगळिकीला भारतानं आपल्या एकाच कृतीतून सडेतोड उत्तर दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

चीनमध्ये ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’ या नावाने मार्शल आर्टच्या स्पर्धा भरवल्या जातात. यासाठी भारतातूनही संघ पाठवला जातो. याहीवर्षी भारताकडून असा संघ पाठवण्यात आला होता. मात्र, चीननं केलेल्या एका कृतीचा निषेध करण्यासाठी भारतानं आपला आख्खा संघच या स्पर्धेतून मागे घेतला आहे. त्यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहिती देताना चीनबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचले का?  इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, तर हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!

विमानतळावरूनच संघ माघारी

दरम्यान, भारतीय संघ विमानतळावरूनच माघारी फिरल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी मध्यरात्री नवी दिल्ली विमानतळावर भारतीय संघाला प्रस्थानाच्या काही मिनिटं आधी अडवण्यात आलं. या संघात अरुणाचल प्रदेशमधील तीन खेळाडूंचा समावेश नव्हता. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राघवेंद्र सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “आम्हाला सीआयएसएफच्या जवानांनी प्रस्थानाच्या गेटवरच अडवण्यात आलं. त्यांनी यासाठी कोणतंही कारण सांगितलं नाही. आम्ही सरकारच्या निर्देशांनुसार काम करतोय, एवढंच त्यांनी आम्हाला सांगितलं”, असं राघवेंद्र यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

काय केलं चीननं?

चीनमध्ये भरवण्यात येणाऱ्या मार्शल आर्टच्या स्पर्धांसाठी भारतभरातून खेळाडूंची निवड केली जाते. त्याचप्रमाणे याहीवर्षी चीनच्या चेंगडू प्रांतात भरवण्यात आलेल्या स्पर्धांसाठी भारतानं संघ पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या संघात अरुणाचल प्रदेशमधील तीन खेळाडूंचा समावेश होता. मात्र, चीननं व्हिसा देताना इतर खेळाडूंना ‘स्टॅम्प व्हिसा’ दिला असून फक्त अरुणाचलमधल्या तीन खेळाडूंना ‘स्टेपल्ड व्हिसा’ जारी केला. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी भारतानं आपला संघच माघारी बोलवला आहे.

हे वाचले का?  Khalida Zia : बांगलादेशात राजकीय घडामोडींना वेग; शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी तुरुंगातून सुटणार!

काय म्हणाले अरिंदम बागची?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. “चीनचा हा निर्णय अस्वीकारार्ह आहे. अशा प्रकारच्या कृतीला योग्य तऱ्हेनं उत्तर देण्याचे अधिकार भारताकडे आहेत. भारताचं वैध पासपोर्ट असणाऱ्या नागरिकांना व्हिसा देताना त्यांच्या प्रादेशिकतेच्या आधारावर त्यांच्यात भेदभाव केला जाऊ नये या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आम्ही यासंदर्भात आमची भूमिका चीनी प्रशासनाला कळवली आहे”, असं बागची म्हणाले.

चीननं फेटाळले आरोप

दरम्यान, चीननं आरोप फेटाळताना असं काही नसल्याचा दावा केला आहे. “संबंधित तीन खेळाडूंनी १६ जुलै रोजी व्हिसासाठी अर्ज केला. तोपर्यंत इतर खेळाडूंचे अर्ज पुढे पाठवण्यात आले होते. त्यामुळे त्या तीन खेळाडूंची कागदपत्रे स्वीकारण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर चीन दूतावासानं त्यांचे पासपोर्ट स्टेपल्ड व्हिसासह परत दिले”, असं चीनकडून सांगण्यात आलं आहे.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

चीननं याआधीही अरुणाचल प्रदेशमधील खेळाडू व अधिकाऱ्यांना स्टॅम्प्ड व्हिसा देण्यास नकार दिला आहे. २०११मध्ये ग्वांगझोमधील स्पर्धेसाठी अरुणाचलमधील ५ खेळाडूंनाही अशाच प्रकारे स्टेपल्ड व्हिसा देण्यात आला होता. दोन वर्षांनंतर युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी जाणाऱ्या दोन आर्चर्सलाही स्टेपल्ड व्हिसा देण्यात आला. २०१६मध्ये भारतीय बॅडमिंटन संघाच्या व्यवस्थापकांनी आपण अरुणाचल प्रदेशचे असल्यामुळे आपल्याला चीनचा व्हिसा मिळाला नाही, असा दावा केला होता.