छगन भुजबळ यांच्या संपर्कात आलेल्यांचीही करोना चाचणी

पालकमंत्री भुजबळ यांनी रविवारी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या समवेत करोना आढावा बैठक घेतली होती.

नाशिक : शहर परिसरात करोना रुग्णांचा आलेख वाढू लागल्याने नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करणारे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा तपासणी अहवाल सोमवारी सकारात्मक आल्याने दोन ते तीन दिवसात त्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी, कर्मचारी यांची करोना चाचणी करण्यात येत आहे. काही जणांना घरीच दोन ते तीन दिवस विलगीकरणात राहण्याची सूचना आरोग्य विभागाने के ली आहे.

पालकमंत्री भुजबळ यांनी रविवारी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या समवेत करोना आढावा बैठक घेतली होती. याशिवाय पुढील महिन्यात येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमिवर मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेतही त्यांच्या काही बैठका झाल्या होत्या. सोमवारी भुजबळ यांचा अहवाल करोना सकारात्मक आल्यानंतर ते उपचारासाठी मुंबई येथे रवाना झाले. महापालिके च्या आरोग्य विभागाच्या वतीने भुजबळ यांचे निवासस्थान निर्जंतूक करण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील कर्मचारी, कु टूंबातील अन्य सदस्य यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत भुजबळ यांचा वाहनचालक हा करोनाग्रस्त असल्याचे उघड झाले.

दुसरीकडे, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतीजन चाचणी अहवाल नकारात्मक आला असला तरी त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. साहित्य संमेलन नियोजन संदर्भात झालेल्या आढावा बैठकीस उपस्थित असलेले जयप्रकाश जातेगांवकर, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही चाचणी करावी आणि ज्यांना त्रास होत नाही त्यांनी पुढील दोन ते तीन दिवस घरीच थांबावे असे आवाहन आरोग्य विभागाने के ले आहे.