जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार

अधिकृत आकडेवारीनुसार दोडा, कथुआ आणि रियासी या तीन जिल्ह्यांमध्ये या वर्षी प्रत्येकी नऊ जणांचा दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू विभागाला दहशतवाद्यांनी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात लक्ष्य केल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. जम्मू विभागातील १०पैकी आठ जिल्ह्यांना दहशतवादाची झळ बसली असून त्यामध्ये एकूण ४४ जण ठार झाले आहेत. वर्षभरात एकूण १८ सैनिक शहीद झाले आणि १३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याशिवाय या हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत.

यापूर्वी तीन वर्षांच्या कालावधीत राजौरी आणि पूंछ या नियंत्रणरेषेलगतच्या जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले आणि नागरिकांवर हल्ले करून बरीच प्राणहानी घडवली. सुरक्षा दलांनी केलेल्या उपाययोजनांमुळे २०२४मध्ये या दोन जिल्ह्यांमधील दहशतवादी हल्ल्यांची संख्या कमी झाली. दुसरीकडे उन्हाळा सुरू झाल्यानंतर, म्हणजे एप्रिल-मेपासून जम्मू विभागाच्या रियासी, दोडा, किश्तवार, कथुआ, उधमपूर आणि जम्मू या जिल्ह्यांमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे.पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सूत्रधारांचा जम्मू-काश्मीरच्या शांततापूर्ण भागांमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न असफल करण्यासाठी पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांबरोबरच्या (सीएपीएफ) समन्वयाने लष्कर मोहिमा आखत आहे. विशेषत: दाट जंगलांसारख्या असुरक्षित भागांमध्ये सुरक्षा दलांनी मोहिमा राबवल्या.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

अधिकृत आकडेवारीनुसार दोडा, कथुआ आणि रियासी या तीन जिल्ह्यांमध्ये या वर्षी प्रत्येकी नऊ जणांचा दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला. त्यापाठोपाठ किश्तवारमध्ये पाच, उधमपूरमध्ये चार, जम्मू व राजौरीमध्ये प्रत्येकी तीन आणि पूंछमध्ये प्रत्येकी दोन अशी प्राणहानी झाली. यामध्ये १८ सुरक्षा सैनिक शहीद झाले, १३ दहशतवादी ठार झाले आणि १४ नागरिक मरण पावले. त्यामध्ये सात यात्रेकरू आणि तीन ग्राम संरक्षकांचा समावेश आहे.

हे वाचले का?  Supreme Court : बांगलादेशातून भारतात आलेल्या लोकांना ‘ओळख’ मिळणार? कलम 6 A बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तरी काय?

दशकभरापूर्वी काश्मीरमध्ये अशांतता असताना जम्मू विभाग मात्र तुलनेने शांत होता. मात्र, ऑक्टोबर २०२१पासून राजौरी आणि पूंछ भागात दहशतवाद्यांनी अधिक करून लष्करी वाहनांना लक्ष्य केले आहे. त्यामध्ये ४७ सैनिक शहीद झाले.

दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरू

किश्तवारमध्ये गुरुवारी दोन ग्राम संरक्षकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सोमवारीही सुरू होता. सुरक्षा दलांनी आखलेल्या शोधमोहिमेदरम्यान, किश्तवारमधील केशवान जंगलामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत रविवारी नायब सुभेदार राकेश कुमार शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले. केशवान आणि कुंटवारा जंगलासह अवतीभोवतीच्या परिसरात दहशतवादी लपून बसल्याचा संशय असून गेल्या चार दिवसांपासून ही शोधमोहीम राबवली जात आहे.

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”