पक्षी अभ्यासक राहुल आणि प्रसाद सोनवणे यांनी या पक्ष्याची नोंद केली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या सुमारे ३५० प्रजाती आढळतात.
जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात मातकट पायाची फटाकडी (स्लेटी-लेग्ड क्रेक) या पक्ष्याची नोंद मध्य भारतातील पहिली ठरली आहे. पक्षी अभ्यासक राहुल आणि प्रसाद सोनवणे यांनी केलेल्या संशोधनात स्लेटी-लेग्ड क्रेक या रैलिडी कुळातील आणि स्थानिक स्थलांतरित पक्ष्याची नोंद केली आहे. त्यांचा या पक्ष्यासंदर्भातील शोधनिबंध इंडियन बर्डस् जर्नल या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्यात स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या सुमारे ३५० प्रजाती आढळतात. अभयारण्यात हिवाळी व उन्हाळी स्थलांतरित पक्ष्यांच्या अनेक प्रजाती स्थलांतरकाळात अधिवास करताना दिसून येतात. अभयारण्यात पांढर्या डोक्याचा भारिट, रानपरिट, टायटलरचा पर्णवटवट्या, कडा पंकोळी, ब्ल्यू- कैप्ड रॉक थ्रश, टिकेल्सचा कस्तुर, राखी रानभिंगरी, नवरंग, विविध ककुज आदी स्थलांतरित पक्षी चांगल्या संख्येत आढळतात. यात वन्यजीव संरक्षण संस्थेचे वनस्पती व पक्षी अभ्यासक राहुल व प्रसाद सोनवणे यांनी केलेल्या संशोधनात मातकट पायाची फटाकडी (स्लेटी-लेग्ड क्रेक) या पक्ष्याची नोंद केली आहे. या प्रजातीची ही नोंद मध्य भारतातील पहिलीच छायाचित्रित नोंद आहे.
या संशोधनासाठी सोनवणे यांना यावल अभयारण्याच्या सहायक वनसंरक्षक अश्विनी खोपडे, डॉ. सुधाकर कुर्हाडे यांचे मार्गदर्शन, तर अभयारण्यचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चव्हाण, रवींद्र फालक, अमन गुजर, वन्यजीव संरक्षक संस्थेचे बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, चेतन भावसार यांचे सहकार्य लाभले.
मातकट पायाची फटाकडी पक्ष्याचे वैशिष्ट्ये
मातकट पायाची फटाकडी (स्लेटी-लेग्ड क्रेक)चे पाय हिरवट राखाडी असून, बोटे लांबसडक असतात. याची वरील बाजू गडद तपकिरी, पोटाकडील बाजूवर पांढरे व काळे पट्टे असतात. चोच हिरवी व डोळे लाल असतात. शेपटी आखूड असते. हे पक्षी घनदाट जंगलातील पाणथळ जागी आढळतात. हे सायंकाळी अन्नाच्या शोधात बाहेर पडतात.
यावल अभयारण्य अतिमहत्त्वाचे पक्षी अधिवास क्षेत्र घोषित होण्यास पात्र आहे; परंतु वाढते अतिक्रमण, जंगलतोड, अपुरे मनुष्यबळ यांमुळे जळगाव जिल्ह्यातील पक्ष्यांचा हा समृद्ध अधिवास धोक्यात येत आहे. अभयारण्याच्या सुरक्षेसाठी पुरेशा मनुष्यबळासह इतर संवर्धन प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे यांनी व्यक्त केले. स्लेटी-लेग्ड क्रेकची यावल अभयारण्यातील ही नोंद संपूर्ण मध्य-भारतातील तसेच महाराष्ट्रातील पश्चिम घाटाबाहेरील पहिलीच आहे. अभयारण्यातून नवनवीन पक्ष्यांची नोंद होणे तेथील पक्षी विविधतेच्या संपन्नतेचे प्रतीक आहे, असे मत पक्षी अभ्यासक प्रसाद सोनवणे यांनी व्यक्त केले.