जळगावात २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सुवर्णनगरी जळगावात सोने खरेदीस प्रतिसाद दिसून आला.

जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सुवर्णनगरी जळगावात सोने खरेदीस प्रतिसाद दिसून आला. सुवर्ण खरेदीतून २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

काही दिवसांत सोन्याच्या प्रतितोळा दरात मोठी वाढ झाली आहे. तरीही सुवर्ण खरेदीस ग्राहकांचा उत्साह कायम दिसून आला. लग्नसराईमुळेही खरेदी वाढली असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. बुधवारी सोने दर प्रतितोळा ५८ हजार ७०० रुपये, तर चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार रुपये होता. दोन फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर प्रतितोळा ५८ हजार ८८० रुपये होता. त्यात महिनाभरापासून चढ-उतार सुरूच होते. गुढीपाडव्याच्या दोन दिवसांपूर्वी सोने प्रतितोळा ६० हजारांपुढे गेले होते. सोमवारी दर ५९ हजार ७५० रुपये होते. तीन दिवसांत सोन्याच्या दरात प्रतितोळा सुमारे एक हजार ५० रुपयांनी घसरण झाली. मुहूर्तावर खरेदी करायची असल्याने अनेक जुने दागिने मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर कलाकुसरीचे दागिने करण्यास पसंती देण्यात आली. कलाकुसरीच्या बारीक सोनपोत, कर्णफुले, गव्हाळ मणी, डिझाइनर पँडल; यासोबत पुरुषांच्या सोनसाखळीला मागणी असल्याने आगामी काळात खरेदी वाढू शकते.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

चांदीची चमकही कायम राहिली. बुधवारी चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार रुपये होता. मंगळवारी सायंकाळी चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार ५०० रुपये होता. त्यात बुधवारी ५०० रुपयांची घसरण झाली.

सध्या सोन्या-चांदीचे दर दिवसागणिक वाढतच आहेत. अमेरिकेतील बँकांची स्थिती नाजूक झाली असून, दोन बँका डुबल्या आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढतेच राहणार आहेत. ते कमी होण्याची शक्यता कमीच आहे. आगामी काळातही दिवसागणिक दर वाढून सोन्याचा प्रतितोळा दर ६२ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. सोने खरेदीदारांची संख्या ५० टक्के आणि गुंतवणूकदारांची संख्या ५० टक्के आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर