जिल्ह्यात केवळ १९ अनुत्तीर्ण; बाकी सारेच उत्तीर्ण!

राज्य परीक्षा मंडळाने घेतलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.

इयत्ता दहावीचे मूल्यांकन जाहीर

नगर: राज्य परीक्षा मंडळाने घेतलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. नगर जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला. केवळ १९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मंडळाने मूल्यांकनाची नवीन पद्धत तयार करून हा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे जवळपास सारेच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाचा निकाल ९९.९९ टक्के लागला आहे. जिल्ह्यतील चार तालुक्यांचा निकाल १०० टक्के आहे.

करोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे शाळा गेल्या वर्षभरात क्वचितच कधी भरल्या, परीक्षाही रद्द करण्यात आली. त्यामुळे शिक्षण विभागाने मूल्यांकनाची नवी पद्धत तयार करून निकाल जाहीर केला. त्यानुसार इ. ९वी मध्ये मिळालेल्या गुणाच्या ५० टक्के, इ. १० वीतील अंतर्गत मूल्यमापनाचे ३० व तोंडी—प्रात्यक्षिक परीक्षेद्वारे २० गुण अशी एकूण शंभर गुणांपैकी द्यायच्या गुणाची मार्गदर्शक तत्त्वे मंडळाने शाळांना कळवली होती. शाळांनी त्या विहित मार्गदर्शक तत्त्वानुसार मंडळाला गुण कळवले. त्यानुसार हा निकाल मंडळाने जाहीर केल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी दिली.

हे वाचले का?  Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

जिल्ह्यत यंदा ७० हजार ५८९ विद्यार्थ्यांंनी परीक्षेसाठी नाव नोंदवले होते. त्यातील ७० हजार ५८५ जण परीक्षेस दाखल झाले. २६ हजार ४८१ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून, ३० हजार ३६१ प्रथम श्रेणीत, १३ हजार ११६ द्वितीय व ६०८ तृतीय श्रेणीत, असे एकूण ७० हजार ५६६ विद्यार्थी (९९.९७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

फेरपरीक्षा (रिपीटर) विद्यार्थ्यांंमध्ये २ हजार ५७२ जणांनी नाव नोंदवले होते, सर्व जण परीक्षेस दाखल झाले. त्यातील ३१ जण विशेष प्रावीण्य, २०३ जण प्रथम श्रेणीत, ३५२ द्वितीय, तर १ हजार ९३० तृतीय श्रेणी असे एकूण २ हजार ५१६ जण (९७.८२ टक्के) उत्तीर्ण झाले.

तालुकानिहाय उत्तीर्णची टक्केवारी पुढीलप्रमाणे— अकोले १०० टक्के, जामखेड ९९.९५, कर्जत ९९.८८, कोपरगाव १००, नगर ९९.९८, नेवासे १००, पाथर्डी ९९.९५, राहता ९९.९६, राहुरी ९९.९५, संगमनेर ९९.९५, शेवगाव ९९.९७ श्रीगोंदे १००, श्रीरामपूर ९९.९७ टक्के.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…

विद्यार्थ्यांंना फारसे परिश्रम न करता तुलनेत चांगले गुण मिळाले आहेत. परंतु सध्या स्पर्धेचे वातावरण असल्यामुळे इयत्ता अकरावीमध्ये विद्यार्थ्यांंना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांंना प्रत्यक्ष परीक्षेसाठी अभ्यास करून मिळणाऱ्या गुणांपेक्षा मिळालेले गुण अधिकच आहेत.

—उल्हास दुगड, मुख्याध्यापक, भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय.

तांत्रिक अडचणींचा खो!

राज्य परीक्षा मंडळाने निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र निकालाच्या संकेतस्थळाशी संपर्क होण्यात अनेक तांत्रिक अडचणी जाणवत होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थी, शाळांना त्यांचा निकालच समजला नाही. सायंकाळपर्यंत ही परिस्थिती कायम होती. शाळांच्या मुख्याध्यापकांनी यासंदर्भात पुणे मंडळ, शिक्षण विभागाशी संपर्क केला मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

करोनाच्या परिस्थितीमुळे राज्य सरकार व परीक्षा मंडळ या दोघांनीही सर्वच विद्यार्थ्यांंना वर्गोन्नत करण्याचे आदेश व सूत्र ठरवून दिले होते. इ. ९ वी व दहावीच्या अंतर्गत गुणांनुसार निकाल जाहीर करण्यात आला.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

— सुनील पंडित, मुख्याध्यापक, प्रगत उच्च माध्यमिक विद्यालय.

मूल्यांकनाद्वारे निकाल जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जे विद्यार्थी मिळालेल्या गुणांबद्दल समाधानी नसतील त्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत अधिक गुण मिळविण्याच्या दोन संधी दिलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये.

—अशोक दोडके, प्राचार्य, रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालय