जिल्ह्यात पूरस्थिती कायम ; १४ धरणांमधून विसर्ग ; बालिकेसह दोन जण वाहून गेले ; अलंगुण बंधारा फुटल्याने घरांमध्ये पाणी

गोदावरी, दारणा, कादवासह अनेक नद्यांना पूर आला असून दुसऱ्या दिवशीही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकले नाही

नाशिक : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. जवळपास १४ धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. दिंडोरी तालुक्यात कोचरगाव येथे मंगळवारी सकाळी आळंदी नदीच्या पुरात सहा वर्षांची बालिका वाहून गेली. त्र्यंबकेश्वरच्या मौजे तळेगाव येथे किकवी नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथे बंधारा फुटल्याने शेतासह काही घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले.

गोदावरी, दारणा, कादवासह अनेक नद्यांना पूर आला असून दुसऱ्या दिवशीही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकले नाही. सलग चार दिवसांपासून  मुसळधार पावसाला सामोरे जाणाऱ्या सुरगाणा, पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वच नद्या, नाल्यांना पूर आल्याची स्थिती आहे. अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. शहरातून वाहणाऱ्या गोदावरीची पूरस्थिती दुसऱ्या दिवशीही कमी झाली नाही.  गंगापूरमधून १० हजार क्युसेकचा विसर्ग कायम आहे. शहरात दिवसभरात पावसाने काहिशी विश्रांती घेतली होती. त्यामुळे इतर भागातून पात्रात मिसळणारे पाणी कमी झाले. सायंकाळी होळकर पुलाखालून गोदापात्रात आदल्या दिवशीच्या तुलनेत काहिसे कमी म्हणजे १२ हजार ६७१ क्युसेक पाणी वाहत होते. काठावरील बहुतांश मंदिरे अद्याप पाण्याखाली आहेत. मालेगाव तालुक्यात मोसम, गिरणा नदीच्या उगम क्षेत्रावर कोसळणाऱ्या पावसामुळे दोन्ही नद्यांना पूर आला असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

हे वाचले का?  कमी बससंख्येमुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंब

िदडोरीतील कोचरगाव येथे विशाखा लिलके ही सहा वर्षांची मुलगी पुरात वाहून गेली. काका भोलेनाथ लिलके यांच्यासमवेत ती शेतातून घरी निघाली होती. आळंदी नदी पार करताना दोघेही पुरात वाहून गेले. भोलेनाथ हे पोहून बाहेर आले. पण विशाखा वाहून गेली. बचाव पथकांकडून तिचा शोध सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वरच्या तळेगाव येथील पोपट गांगुर्डे (३७) हे बेपत्ता असून किकवी नदीत ते वाहून गेल्याचा संशय आहे. स्थानिक पातळीवर शोधकार्य सुरू आहे. त्र्यंबकेश्वरच्या वरसविहीर येथे दत्तू जावळे यांची म्हैस पाण्यात पडून मयत झाली.

अतिवृष्टीत सुरगाणा तालुक्यात अलंगुण गावालगतचा मातीचा बंधारा धसल्याने पाण्याचा प्रचंड लोंढा नदीपात्रालगतच्या घरात आणि शेतात शिरला. गतवर्षी ग्रामस्थांनी बंधाऱ्यातील गाळ काढून पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी अतिरिक्त साठय़ाची व्यवस्था केली होती. पण, सातत्याने सुरू असलेल्या पावसात तो तग धरू शकला नाही. बंधाऱ्यात मोठय़ा प्रमाणात पाणी साचत असल्याने अतिरिक्त पाणी काढण्यासाठी जेसीबीने सांडवा मोकळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दाब वाढत गेल्याने बंधारा फुटून नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

१४ धरणांमधून विसर्ग

पावसाची तीव्रता लक्षात घेऊन अनेक धरणांमधील विसर्ग कमी-अधिक केला गेला. परंतु, गंगापूरमधून १००३५ आणि दारणातून १५०८८ क्युसेकने विसर्ग कायम आहे. ओझरखेड ३५१७, वाघाड ८०४, करंजवण १४७९५, हरणबारी ५५४८, पालखेड २५७८०, चणकापूर १५२७५, ठेंगोडा २१८४०, पुनद ९५८९, कडवा ३५१७, पुणेगाव ३९१८, हरणबारी ६२२१ क्युसेकने विसर्ग होत आहे. गोदावरी, दारणा आणि कादवा नद्यांना पूर आल्यामुळे नांदूरमध्यमेश्वरमधून ७८ हजार २७६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

जलसाठा ६३ टक्क्यांवर

मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ होऊन तो ६३ टक्क्यांवर पोहोचला आहे. लहान मोठय़ा २४ धरणांमध्ये ४२ हजार २४८ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. गतवर्षी हे प्रमाण याच दिवशी केवळ २७ टक्के होते. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिकने यंदा जलसाठा आहे. वाघाड व हरणबारी धरण तुडुंब भरून वहात आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ६७ टक्के, दारणा (७०), मुकणे (६०), भावली (७४), वालदेवी (६५), कश्यपी (४९), गौतमी गोदावरी (५८), कडवा (७०), आळंदी (८४), भोजापूर (३८), पालखेड (४८), करंजवण (८०), ओझरखेड (९७), तिसगाव (८७), पुणेगाव (५९), चणकापूर (६७) आणि केळझर धरणात (७३) टक्के जलसाठा झाल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

हे वाचले का?  दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा