जिल्ह्यातील धरणसाठा ९६ टक्क्यांवर; पाण्याची चिंता मिटली

शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरसह या समुहातील काश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी ही सर्व धरणे पूर्णपणे भरली आहेत.

पाण्याची चिंता मिटली, हंगामात १६ हजार ७४० मिलीमीटर पाऊस

नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरतात की नाही ही साशंकता दूर झाली असून धरणसाठा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी इतकाच जलसाठा झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.

शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरसह या समुहातील काश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी ही सर्व धरणे पूर्णपणे भरली आहेत. सध्या या धरण समुहात १० हजार १६६ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. पालखेड, वाघाड, तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, चणकापूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, गिरणा, पुनद, माणिकपूंज ही सर्व धरणे तुडूंब भरलेली आहेत. गिरणा हे उत्तर महाष्ट्रातील सर्वात मोठे धरण. त्याची क्षमता १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. तेही परतीच्या पावसाने तुडूंब झाले.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

करंजवण, पुणेगाव, नांदूरमध्यमेश्वर ही जवळपास भरलेली आहेत. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांची एकूण साठवण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट आहे. सध्या धरणांमध्ये  ६३ हजार १६४ दशलक्ष  घनफूट जलसाठा आहे. गेल्या वर्षी  थोड्या फार फरकाने हे प्रमाण सारखेच होते.

एक जून ते १२ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात १६ हजार ७४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. प्रारंभी काही निवडक भागात हजेरी लावणाऱ्या पावसाने उर्वरित भागाची परीक्षा पाहिली.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

हंगामातील निम्म्या कालावधीत संपूर्ण जिल्हा त्याने व्यापला  नव्हता. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा साठा होईल की नाही याबद्दल धास्ती व्यक्त केली जात होती. अखेरच्या टप्प्यात पावसाने सर्व कसर भरून काढली. आता तर गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २५० मिलीमीटर अधिक पाऊस झाला आहे. अखेरच्या टप्प्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे सध्या प्रगतीपथावर  आहेत.

तीन धरणे बाकी

बहुतांश धरणे तुडूंब भरली असली तरी मुकणे, ओझरखेड आणि भोजापूर ही तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकली नाहीत. मुकणे धरणात सध्या पाच हजार ४९७ दशलक्ष घनफूट म्हणजे ७६ टक्के जलसाठा आहे. ओझरखेड धरणात १८३७ (८६ टक्के) तर भोजापूरमध्ये २११ दशलक्ष  घनफूट (५८ टक्के) जलसाठा झाला आहे. गिरणा खोऱ्यातील जवळपास सर्वच धरणे तुडूंब भरली. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समुहातील धरणांत समाधानकारक जलसाठा झाला. पालखेड धरण समुहातील ओझरखेड तर दारणा धरण समुहातील मुकणे ही दोन धरणे पूर्णपणे भरू शकली नाही.