जिल्ह्य़ातील शाळा सुरू करण्यास प्रशासनाची परवानगी

शाळा व्यवस्थापन-पालकांच्या निर्णयाला महत्त्व

शाळा व्यवस्थापन-पालकांच्या निर्णयाला महत्त्व

पालघर : पालघर नगरपरिषद तसेच बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहत परिसरातील गावे वगळून जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सरसकट सर्वच गावांमध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यास शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांची संमती असणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकांश भागांमधील शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी या पूर्वी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती तसेच पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधील शाळा ३१ डिसेंबपर्यंत सुरू न करण्याचे निर्देश  जारी केले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आजाराचा संसर्ग व संक्रमणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्याच्या बाबतीत निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधील शाळा व्यवस्थापन समितीस ठराव मंजूर असल्यास तसेच विद्यार्थी-पालक समितीने त्याला संमती दिली असल्यास जिल्ह्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. असे करताना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १० नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून पालघर नगरपरिषद तसेच बोईसर तारापूर औद्योगिक परिसरातील शाळा वगळून जिल्ह्यातील शाळांमधील नववी ते बारावीच्या वर्ग सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. यापूर्वी  दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ५४ शाळा सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. आता या नवीन आदेशामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा लवकरात लवकर सुरू होतील, अशी आशा व्यक्त केली आहे.