‘जेईई मेन्स’मध्ये सहा विद्यार्थी अव्वल

परीक्षेनंतर केवळ दहा दिवसांत निकाल प्रवेश परीक्षा कक्षाने निकाल जाहीर केला.

पुणे, मुंबई : राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य असलेल्या सामाईक प्रवेश परीक्षा साखळीतील मुख्य परीक्षेचा (जेईई मेन्स) निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील सिद्धांत मुखर्जी याच्यासह देशातील सहा विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेटाईल मिळवले आहेत. परीक्षेनंतर केवळ दहा दिवसांत निकाल प्रवेश परीक्षा कक्षाने निकाल जाहीर केला.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना संधी गमवावी लागू नये यासाठी यंदा चारवेळा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यातील पहिली परीक्षा राष्ट्रीय परीक्षा कक्षाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान घेतली. या परीक्षेचा निकाल अवघ्या दहा दिवसांत जाहीर करण्यात आला आहे.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

राज्यातील सिद्धांत मुखर्जीसह राजस्थान येथील साकेत झा, दिल्ली येथील प्रवर कटारिया आणि रंजिम प्रबल दास, गुजरात येथील आदिनाथ किदांबी, चंदिगड येथील गुरमित सिंग यांना शंभर पर्सेटाईल मिळाले आहेत.

मुलींमध्ये तेलंगणाची कोम्मा शरण्या (९९.९९ पर्सेटाईल) अव्वल ठरली.

ही परीक्षा देशभरातील ३३१ केंद्रावर घेण्यात आली. त्यापैकी नऊ केंद्र परदेशातील होती.

हे वाचले का?  IAS Puja Khedkar used OBC quota : कोट्यवधींची संपत्ती असलेल्या पूजा खेडकर यांनी MBBS चा प्रवेशही ओबीसी कोट्यातून घेतला

फेब्रुवारीच्या परीक्षेसाठी ६ लाख ५२ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १ लाख ९७ हजार ७७१ मुली, ४ लाख ५४ हजार ८५२ मुले आणि ४ तृतीय पंथीयांचा समावेश होता. त्यापैकी ६ लाख २९ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

यंदा इंग्रजी, हिंदी आणि गुजरातीसह पहिल्यांदाच आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू मिळून एकूण १३ भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षार्थीचे सर्वाधिक प्राधान्य इंग्रजी, त्यानंतर हिंदीला होते.