बंदमुळे खंडोबा महाराज गाडीतून कऱ्हा स्नानासाठी
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द केल्याने आज जेजुरीत शुकशुकाट जाणवला. सकाळी सहा वाजता कऱ्हा स्नानासाठी खंडोबा-म्हाळसा देवीच्या मूर्ती गाडीतून नेण्यात आल्या. यावेळी खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त अड प्रसाद शिंदे,विश्वस्त संदीप जगताप,शिवराज झगडे,राजकुमार लोढा,पंकज निकुडे,अडअशोक संकपाळ,मुख्य इनामदार राजाभाऊ पेशवे,सचिन पेशवे,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे आदी उपस्थित होते.पोलिसांनी तीन दिवस जेजुरीत जमावबंदीचा हुकूम जारी केला होता. त्यामुळे आज जेजुरीत भाविक आले नाहीत. खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा मोठी मानली जाते. यात्रेसाठी राज्यातून सुमारे अडीच ते तीन लाख भाविक येतात यंदामात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेऊन सोमवती यात्रा रद्द केली. सोमवती यात्रेला खंडोबा गडावरून देवाची पालखी वाजत गाजत निघते. यावेळी हजारो भाविक भंडाऱ्याची मुक्त उधळण करतात.आज पालखी सोहळा काढण्यास व गर्दी करण्यास मनाई असल्याने पहाटे देवाची भूपाळी व आरती झाल्यावर सहा वाजता खंडोबा म्हाळसा देवीच्या मूर्ती कऱ्हा स्नानासाठी निघाल्या. मोजके पुजारी,मानकरी-खांदेकरी यावेळी उपस्थित होते.पारंपारिक वाद्य वाजवून शेडा दिल्यावर पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करीत देवांच्या मूर्ती गडाबाहेर आणण्यात आल्या. यानंतर सजवलेल्या गाडीमध्ये मूर्ती ठेवून त्या कऱ्हा नदीवर स्नानासाठी नेण्यात आल्या. तेथे धार्मिक वातावरणामध्ये देवांच्या मूर्तींना स्नान घालून आरती म्हणण्यात आली. यावेळी उपस्थित पुजारी भाविकांनी ” सदानंदाचा येळकोट ” असा जयघोष करत भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.
भाविकांनी खंडोबा गडाकडे जाऊ नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह १० पोलिस अधिकारी १०० पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सोमवारी जेजुरीतील सर्व रस्त्यांची नाकाबंदी करून उपहारगृहे,लॉज बंद ठेवण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन करून आलेल्या काही वाहनावर तसेच लोकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दसरा व दोन सोमवती यात्रावर बंदी घालण्यात आली. व्यवसाय बंद राहिल्याने बाजारपेठेत निराशा जाणवली.