टीम इंडिया करणार श्रीलंका दौरा – सौरव गांगुली

दौऱ्यात खेळणार ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने एका मुलाखती दरम्यान भारतीय संघाच्या आगामी दौर्‍याबाबत खुलासा केला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौर्‍यावर जाईल, तेथे ते ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळतील, असे गांगुलीने सांगितले. आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धची मालिका यादरम्यान ४०-४५ दिवस कोणताही सामना होणार नाही.

एका स्पोर्ट्स वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने भारत-श्रीलंका मालिकेबद्दल सांगितले, ”जुलैमध्ये आम्ही आयपीएल आयोजित करू शकत नाही, कारण त्या काळात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेत जाईल, जेथे आयसीसी वर्ल्ड सुपर लीग अंतर्गत ते ३ एकदिवसीय सामने खेळतील.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील शेवटची टी-२० मालिका २०१९-२०मध्ये खेळली गेली होती, त्यात टीम इंडियाने दोन सामने जिंकले होते, तर पहिला सामना रद्द करण्यात आला होता. भारताने दुसरा टी-२० ७ गडी राखून जिंकला आणि तिसरा सामना ७८ धावांनी जिंकला.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

श्रीलंकेच्या शेवटच्या दौर्‍यावर भारतीय संघाने एकदिवसीय मालिका आणि टी-२० मालिका जिंकल्या होत्या, तसेच निदाहास करंडकही जिंकला होता. वर्ल्ड कप २०१९मध्ये दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यात खेळले होते, तिथे रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला. आता सौरव गांगुलीच्या निर्णयानंतर पुन्हा दोन्ही संघ मैदानावर एकदा एकमेकांविरूद्ध दिसतील.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

आयपीएलबाबत गांगुली म्हणाला…

इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे ‘आयपीएल’ प्रशासकीय मंडळ आणि ‘बीसीसीआय’ सर्व शक्यतांचा विचार करून अंतिम निर्णय घेतील. जूनच्या मध्यापर्यंत हा निर्णय होणे अपेक्षित आहे. ‘‘आम्ही अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांशी चर्चा करून ट्वेन्टी-२० विश्वचषकाआधी आयपीएलचे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अनेक गोष्टी निगडित असल्याने आम्ही धीम्या गतीने त्यावर काम करत आहोत. ‘आयपीएल’ २०२१चे आयोजन करण्यात आम्ही असमर्थ ठरलो तर जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान आम्हाला सोसावे लागेल,’’ असेही गांगुली म्हणाला.