“टोळी मुकादमाला घरी बसवणार, म्हातारा झाला तरीही खूपच…”, मनोज जरांगे पाटील यांची भुजबळांवर टीका

शेवगावच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांनी काय काय म्हटलं आहे? जाणून घ्या

टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, म्हातारा झाला असला तरी खूप गडबड चालू आहे. असं म्हणत पुन्हा एकदा नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ हे वारंवार आरोप करत आहेत आता त्यांना तंबी देणाऱ्या अजित पवारांना सांगणं आहे की ते शांत बसले नाहीत तर मीही शांत बसणार नाही. अहमदनगर येथील शेवगावमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली त्यात भुजबळांवर टीका केली.

मी गप्प बसलो होतो पण…

“मी २०-२५ दिवस गप्प बसलो होतो. मी काही बोललो नव्हतो. तरीही अंबडच्या सभेत तो का बोलला? वय झालं आहे त्यामुळे माणसाला पचत नाही. खायची सवय लागली आहे. महाराष्ट्र सदन, जनतेचा पैसा सगळं ओरबाडून खाल्लं आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. एका बैठकीत ठरलं आहे सगळ्या मंत्र्यांना तंबी दिली आहे की जातीय तणाव निर्माण व्हायला नको. फक्त मनोज जरांगे पाटील यांनी कुणाचा एकेरी उल्लेख करु नये. मी शांत बसलो होतो तेव्हा येवल्यातले बोर्ड त्याने फाडले. मग मी कसं काय शांत बसू? मी आज अजित पवार यांनाही सांगतो आहे जर ते शांत बसले नाही तर मी शांत बसणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माझं हेच सांगणं आहे. कायदा पाळणं हे त्यांचंही काम आहे. कार्यकर्त्यांना सांगून आमचे बोर्ड फाडणं बंद करायला सांगा.” असं जरांगे पाटील म्हणाले.

हे वाचले का?  Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ, महायुतीपुढची नेमकी आव्हानं काय?

मुकादम चांगला नाही, त्याला घरी बसवणार

त्याने बऱ्याच जणांना बोलवलं आहे. बाकीच्यांना दोष देण्यात अर्थ नाही पण मुकादम चांगला नाही, त्याला घरी बसवणार आहे. कायदा पायदळी तुडवणाऱ्याच्या मागे मी उभा राहणार नाही असं विजय वडेट्टीवार यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं. यांनी काहीही केलं तरी यांचं षडयंत्र यशस्वी होऊ द्यायचं नाही. त्यांना सामाजिक तेढ निर्माण करायचं आहे. ओबीसीमधल्या सामान्य लोकांना वाटतं की पुरावे मिळाले असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे. हा खातो किती? याला पुरेनाच. अरे किती खातो? अनेक दिवसांपासून एकटाच खातो आहे.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका

अजित पवारांनी छगन भुजबळांना तंबी दिली आहे

मला असे समजले की अजित पवार यांनी त्यांना(छगन भुजबळ) तंबी दिली आहे. तरीही आज मराठा समाजाची पोस्टर फाडली गेली. मग अजित पवारांनी त्यांना कसली तंबी दिलीय, शांत बसण्यासाठी की पोस्टर फाडण्यासाठी? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी भाषणात आणि सभेनंतर माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. यातली काही बोर्ड अज्ञातांनी फाडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यावर जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त करत या मागं षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. एकीकडे अजित पवार छगन भुजबळ यांना शांत राहण्याची तंबी दिल्याचे बोलले जाते. मात्र दुसरीकडे आमचे बोर्डही फाडले जात आहेत. याबद्दल जरांगे पाटील यांनी शंका व्यक्त करत हा मराठा समाजामध्ये असंतोष पसरवण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केली आहे. यामागे षडयंत्र आहेत याचा शोध घेतला जावा असं जरांगे म्हणाले.

हे वाचले का?  ST Strike : महाराष्ट्रात लाल परीची चाके थांबली, एसटी कर्मचारी संपावर गेल्याने वाहतूक विस्कळीत; मुंबई, ठाणे, पुण्यात काय स्थिती?

माझे मराठा समाजाला आवाहन आहे की येत्या २४ डिसेंबर पर्यंत संयम ठेवा, शांतता ठेवा. जाणीवपूर्वक आपले आंदोलन चिरडवण्याचा प्रयत्न असू शकतो. आरक्षण पदरात पडून द्या, मग त्यांचीही बोर्ड आहेतच असा सूचक इशारा जरांगे पाटील यांनी भाषणात दिला.