डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक लेह-लडाखमधील ‘कांगयात्से’ शिखरावर

बर्फ, थंडीचा कडाका अशा बिकट परिस्थितीत हे आव्हान स्वीकारल्याने सर्वत्र कौतुक

दरवर्षी देशाच्या विविध भागातील डोंगर दऱ्यांमध्ये, सह्याद्री पर्वत रांगा, हिमालयात गिर्यारोहणाचा आनंद लुटणाऱ्या डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकांच्या एका गटाने लेह-लडाख मधील २१ हजार फूट उंचीच्या ‘कांगयात्से’ शिखरावर यशस्वी गिर्यारोहण केले. बर्फ, थंडीचा कडाका अशा बिकट परिस्थितीत या ज्येष्ठांनी हे आव्हान स्वीकारल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

डोंबिवलीतील माऊंटेनिअर्स संस्थेच्या सहकार्याने ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या या गटाने लेह लडाख मधील सर्वाधिक खोलीची ९० किलोमीटरची मरका दरी पार करण्याची मोहीम यशस्वी केली. त्यानंतर या गटाने लेड लडाख मधील २१ हजार फूट उंचीचे कांगयात्से दोन हे शिखर चढण्यास सुरूवात केली. अनेक अडथळे पार करत, सतत बदलणाऱ्या हवामानावर मात करत एकमेकांना साथ देत मांऊंटेनिअर्स संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांच्या १० जणांच्या गटाने कांगयत्से दोन शिखरावर पाऊल ठेवले. यावेळी तेथे काही वेळ घालवून, झेंडा फडकवून ज्येष्ठ नागरिकांनी परतीचा प्रवास केला.

हे वाचले का?   ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

या मोहिमेत डोंबिवलीतील दिलीप भगत, सतीश गायकवाड, संजय राणे, विश्वास ताम्हणकर, सदानंद दांडेकर, एम. भुपती, मंजिरी सातारकर, विलसिनी सनील सहभागी झाले होते.

माऊंटेनिअर्स संस्थेतर्फे नियमित हिमालयातील मोहिमा त्याच बरोबर सह्याद्रितील गड, किल्ले, दुर्ग भ्रमण, शालेय मुलांच्या सहली, दुर्गप्रेमी यांच्या मोहिमांचे आयोजन केले जाते. अनेक वर्ष या संस्थेतर्फे दर रविवारी गिर्यारहोण सरावाचे आयोजन केले जाते, असे संस्था पदाधिकाऱ्याने सांगितले.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!