तक्रारींबाबत पोलिसांकडून अभ्यास सुरू भाजप शिष्टमंडळास आयुक्तांचे आश्वासन

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे संतप्त पडसाद दोन दिवसांपूर्वी शहरात उमटले होते.

नाशिक : भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे अद्याप न सापडलेले सेना नगरसेवक, मुंबईत गुन्हा दाखल झालेल्या युवा सेना पदाधिकाऱ्याचे मुख्यमंत्र्यांनी केलेले अभिनंदन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य, शिवसेनेच्या मुखपत्रात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबतचे आक्षेपार्ह लिखाण आदींबाबत तक्रारी देऊनही अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्न सलग तिसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांची भेट घेऊन केला. शिवसेनेच्या मुखपत्रातील राणेंबाबतचे लेखन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठविले गेले आहे. तर अन्य दोन तक्रारींवर अभ्यास केला जात असल्याचे आयुक्तांनी शिष्टमंडळास सांगितले.

हे वाचले का?  नाशिक पूर्वमध्ये भाजप-शरद पवार गटात वाद; वाहनाची तोडफोड, पैसे वाटपाची तक्रार

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे संतप्त पडसाद दोन दिवसांपूर्वी शहरात उमटले होते. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत केंद्रीय मंत्री राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनेचे वरुण सरदेसाई, सेनेच्या मुखपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे, मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सेनेचे आमदार बांगर आदींविरोधात विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. भाजपच्या देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले या आमदारांसह शहराध्यक्ष गिरीश पालवे आदींनी पुन्हा पोलीस आयुक्तांची भेट घेतली. भाजप कार्यालयावर दगडफेक करणारे सेनेचे नगरसेवक आणि शिवसैनिकांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना राजाश्रय मिळाला का, असा प्रश्न करण्यात आला. अनेक तक्रारींबाबत अद्याप गुन्हे दाखल झालेले नसल्याकडे लक्ष वेधले.

हे वाचले का?  नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा

यावर आयुक्तांनी मुखपत्रातील संबंधित लिखाण प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले. अन्य तक्रारींवर अभ्यास करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. राणे यांच्याविषयी सेना आमदार बांगर यांनी प्रक्षोभक विधाने केली. त्यांच्याविरुद्ध दोन तक्रारी दिल्या जात असल्याचे पालवे यांनी सांगितले.