“…तर आमचा पुढचा बॉम्ब जहाजाच्या मार्गात नाही जहाजावर पडेल”; रशियाने ब्रिटनला दिला इशारा

ब्लॅक सीमधील हलचालींवरुन रशिया आणि ब्रिटन आमने सामने आले असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर आरोप केले जात असतानाच रशियाने ब्रिटनला थेट बॉम्ब हल्ल्याची धमकी दिलीय

रशियाने गुरुवारी ब्रिटनला थेट इशारा देत ब्रिटीश नौदलाच्या जहाजावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिलीय. काळ्या समुद्रामध्ये रशियन समुद्र सीमेजवळ ब्रिटीश नौदलाने अधिक हलचाली करुन आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही ब्रिटीश जहाजांवर बॉम्ब हल्ला करु असं रशियाने स्पष्ट केलं आहे.

रशियाने मॉस्कोमधील ब्रिटीश उच्चायुक्तांना समन्सही पाठवले आहेत. ब्रिटश जहाजांनी आंतरराष्ट्रीय समुद्री सीमांचे उल्लंघन केल्याचा आरोप रशियाने केला आहे. मात्र दुसरीकडे ज्या भागामध्ये ब्रिटीश जहाजं होती तो भाग जगातील अनेक देश युक्रेनच्या सागरी हद्दीत असल्याचं मानतात. जे काही घडलं त्याची चुकीची माहिती रशियाकडून दिली जात असल्याचा आरोप ब्रिटनने केलाय. ब्रिटीश जहाजांसाठी कोणतेही वॉर्निंग शॉर्टस किंवा बॉम्ब रशियन नौदलाने फेकलेले नाहीत असंही ब्रिटनने स्पष्ट केलं आहे. रॉयल नेव्हीवच्या डिफेंडरवर कोणत्याही पद्धतीचा हल्ला झालेला नाही असं ब्रिटनने म्हटलं आहे.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा

रशियाने मॉस्कोमधील ब्रिटनचे उच्चायुक्त दिबोर्ह बोरिनर्ट यांना सन्मस पाठवले आहेत. ज्यामध्ये काळ्या समुद्रामधील ब्रिटनच्या जहाजांची हलचाल ही धोकादायक कृती असल्याचं रशियाने स्पष्टपणे नमूद केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकोरोव्हा यांनी लंडनमधून खोटी माहिती दिली जात असल्याचा आरोप केलाय.

“आम्ही साधी तर्कबुद्धी वापरण्याची विनंती करतोय. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करण्याची मागणी करतोय. जर यामधूनही काम झालं नाही तर आम्ही बॉम्ब हल्ला करु शकतो,” असं उप परराष्ट्र मंत्री सेरजी रायबकोव्ह यांनी रशियन वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितलं आहे.  रायबकोव्ह यांनी मॉस्कोने गुरुवारी घडलेली घटना ज्या पद्धतीने मांडली त्याचं समर्थन करताना हे वक्तव्य केलं आहे. रशियाने दिलेल्या माहितीनुसार रशियन लढाऊ विमानांनी ब्रिटीश जहाजांच्या मार्गात बॉम्ब टाकून त्यांचा मार्ग अडवला. याचसंदर्भात बोलताना रायबकोव्ह यांनी, “पुढील बॉम्ब हे केवळ मार्गावर नाही तर थेट टार्गेटवर पडतील,” असा इशाराही दिलाय.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

भूमध्य समुद्री भागांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियाला काळ्या समुद्रातील हलचाली फार महत्वाच्या वाटतात. मात्र याच भागावरुन मागील बऱ्याच कालावधीपासून रशिया, टर्की, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये वाद सुरु आहे. रशियाने युक्रेनच्या समुद्रकिनाऱ्याजवळीच क्रिमिया या भूभाग आपल्या ताब्यात घेत तो आपला प्रदेश असल्याची घोषणा २०१४ मध्ये केली. त्याचबरोबर या प्रदेशाच्या आजूबाजूला असणाऱ्या समुद्रावरही आपलाच ताबा असल्याचं रशियाने स्पष्ट केलं. मात्र पाश्चिमात्य देशांनी रशियाचा हा दावा फेटाळून लावत क्रिमियाचा भाग हा युक्रेनच्याच मालकीचा असल्याचा दावा केलाय. त्यामुळेच रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये वाद सुरुय.