“…तर त्याला भारताकडून उत्तर दिलं जाईल”, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ठणकावलं; ‘त्या’ घटनेचा केला उल्लेख!

एस. जयशंकर म्हणतात, “जेव्हा आम्ही विदेशात आपल्या देशाचा दूतावास स्थापन करतो, आपले राजनैतिक अधिकारी त्यांचं कर्तव्य तिथे बजावतात, तर त्यांना…!”

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत त्यांच्या सडेतोड आणि ठाम भूमिकांसाठी ओळखले जातात. सनदी सेवेतून आधी चीनसह विविध देशांमध्ये भारताचे उच्चायुक्त राहिलेले एस. जयशंकर आता देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जयशंकर यांनी पाकिस्तान, चीन, रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेशी संबंध, दहशतवाद अशा मुद्द्यांवर भारताची बाजू परखडपणे मांडली आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेच्या पार्श्वभूमीवर धारवाडला माध्यमांशी बोलताना जयशंकर यांनी भारताची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

नेमकं झालं काय?

जयशंकर हे धारवाडमध्ये एका चर्चासत्रात सहभागी झाले होते. ‘भाजपा महानगर’तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जयशंकर यांना नुकत्याच लंडनमध्ये घडलेल्या एका घटनेच्या संदर्भात भारताची भूमिका विचारण्यात आली. लंडनमधील भारतीय दूतावासासमोरील तिरंगा खाली उतरवण्याचा प्रयत्न काही खलिस्तान समर्थकांनी करताच त्याचे तीव्र पडसाद देशात उमटले होते. यासंदर्भात भारतानंही त्यावर सडेतोड भूमिका ब्रिटनला कळवली होती.

हे वाचले का?  Social Media Ban for Kids : “लहान मुलांचं बालपण जपण्यासाठी!”, सोशल मीडियावर वयाचं बंधन येणार, ‘हा’ देश कायदा बनवण्याच्या तयारीत!

“भारत आता असा देश नाही, जो हे सहन करेल”

दरम्यान, यासंदर्भात चर्चासत्रामध्ये विचारणा केली असता जयशंकर यांनी त्याव आपली रोखठोक भूमिका मांडली. “जेव्हा भारतानं अशा घटना नरमाईनं घेतल्या असत्या ते दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. आता हा तो भारत नाही, जो कुणीतरी आमचा तिरंगा खाली उतरवण्याचा केलेला प्रयत्न सहन करेल”, असं जयशंकर यावेळी म्हणाले. “हा संदेश फक्त त्या तथाकथित खलिस्तानींनाच नाही, तर ब्रिटनसाठीही आहे. तो आमचा तिरंगा आहे आणि जर कुणी त्याचा अवमान करण्याचा प्रयत्न करेल, तर आम्ही तो अजून भव्य करू”, असंही जयशंकर यांनी नमूद केलं.

हे वाचले का?  ‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत

लंडनमध्ये झालेल्या घटनेनंतर तिथल्या उच्चायुक्तांनी त्याच ठिकाणी भारताचा अजून मोठ्या आकाराचा ध्वज तिथे फडकावला होता. याचाही उल्लेख जयशंकर यांनी यावेळी केला.

“ही त्यांची जबाबदारीच आहे”

यावेळी त्यांनी ब्रिटन किंवा इतर देशांना जबाबदारीची जाणीव करून दिली. “जेव्हा आम्ही विदेशात आपल्या देशाचा दूतावास स्थापन करतो, आपले राजनैतिक अधिकारी त्यांचं कर्तव्य तिथे बजावतात, तर त्यांना सुरक्षा पुरवण्याची पूर्ण जबाबदारी ही त्या देशाचीच असते, याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. कारण आपणही इथे अनेक विदेशी दूतावासांना सुरक्षा पुरवत असतो”, असं जयशंकर म्हणाले.

हे वाचले का?  Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

“जर त्यांनी आपल्या दूतावासांना सुरक्षा पुरवली नाही, जर त्यांनी हे सगळं गांभीर्यानं घेतलं नाही, जर अशा घटना तिथे घडत असतील, तर मग भारताकडूनही त्यांना उत्तर दिलं जाईल”, असा सज्जड दमच जयशंकर यांनी दिला आहे.