…तर नाशिकमध्ये टाळेबंदी अटळ

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधावर भर दिला जाईल.

नियम न पाळणाऱ्या दुकानांवर बंदीची कारवाई

नाशिक : वाढत्या करोनामुळे परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत असून नागरिकांनी नियमांचे पालन न के ल्यास पुन्हा टाळेबंदी करणे क्रमप्राप्त ठरेल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. नियमावलीचे पालन न करणारी दुकाने अनिश्चित काळासाठी बंद केली जातील. बाधित असूनही बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना आढावा बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भुजबळ यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास सुविधा नसताना गृह विलगीकरणात राहणारे आणि बाहेर फिरणारे रुग्ण, मुखपट्टीविना भ्रमंती करणारे बेजबाबदार नागरिक, नियमांचे पालन न करणारे व्यावसायिक आदी घटक कारक ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे प्रशासकीय पातळीवरील हालचालींना वेग आला आहे. दृश्य स्वरूपात यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून अहवाल सकारात्मक येण्याचे प्रमाणही जास्त आहे. १५ मार्च रोजी सकारात्मकतेचे प्रमाण ४५ टक्के होते. यंत्रणेने प्रयत्नपूर्वक सुधारून ते आता ३२ टक्क्यांवर आणले आहे. असे असले तरी मालेगाव मनपा क्षेत्रात सकारात्मकतेचा दर ६१ टक्के असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधावर भर दिला जाईल. गृह विलगीकरणातील व्यक्ती आणि संपर्कातील व्यक्तींच्या शोधण्यासाठी नाशिक महापालिकेने ३० आरोग्य पथके कार्यान्वित केली आहेत. संपर्कातील व्यक्तींची तातडीने चाचणी केली जाईल. दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण तीन हजार ५० वरून आठ हजार वर नेण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे नमुने तपासणीची क्षमता पाच हजारांपर्यंत विस्तारली आहे. बिटको रुग्णालयातील प्रयोगशाळा सुरू होत आहे. या माध्यमातून खासगी आणि शासकीय प्रयोगशाळेच्या माध्यमातून दैनंदिन २० हजार नमुन्यांची तपासणी करता येईल, बिटको रुग्णालयातील प्राणवायूची टाकी कार्यान्वित होत आहे. टाळेबंदी नको असेल तर नियमांचे बंधन पाळणे आवश्यक आहे. गेल्या वेळी ज्या व्यवस्था उभारल्या गेल्या, त्या पुन्हा कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निधीची कमतरता नाही. दुसरीकडे समांतरपणे लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने लस मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पहिला डोस ज्या कंपनीचा घ्याल, तिचाच दुसरा डोस घ्यावा. हे डोस घेताना वेगवेगळे घेऊ नका, ते घातक असल्याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

भाजी बाजारांचा विस्तार करा

अंशत: टाळेबंदी लागू करताना अर्थचक्र, आरोग्यचक्र सुरू राखण्याचा विचार करून नियोजन करण्यात आले. पण काही घटक सवलतीचा गैरफायदा घेत असल्याने त्या बंद कराव्या लागतील. सर्व घटकांनी सहकार्य केले तर या संकटावर मात करता येईल. दुकानदारांना मुखपट्टी नसलेल्यांशी व्यवहार न करणे, गर्दी होऊ न देणे, सुरक्षित अंतराचे पथ्य पाळणे, दुकान उघडणे-बंद करण्याची वेळ आदी नियमावली घालून देण्यात आली. या नियमांकडे काणाडोळा करणारी दुकाने अनिश्चित काळासाठी बंद केली जातील. एकदा कारवाई झाली की करोनाचे निर्बंध लागू असतील तोपर्यंत संबंधित दुकाने बंद राहतील, असे भुजबळ यांनी सूचित केले.  भाजी बाजारात एकाच ठिकाणी गर्दी होते. ती रोखण्यासाठी गतवेळप्रमाणे मोकळी मैदाने वा अन्य भागात त्यांचा विस्तार करावा, असेही सांगण्यात आले आहे.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

मालेगाव पालिका आयुक्तांची रजा रद्द

करोनाचे थैमान सुरू असताना रजेवर गेलेले मालेगाव महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांची रजा रद्द करून त्यांना तातडीने कामावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मालेगावमध्ये ६५० रुग्ण असून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण कमी आहे. आपण करोनाबाधित झाल्यानंतर डॉक्टरांनी अधिक विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु सुट्टी घेण्याची ही वेळ नसल्याचे सांगत भुजबळ यांनी मालेगावच्या आयुक्तांनी करोनाविरोधातील लढाईत सहभागी व्हावे असे सूचित केले.