“तरुणांच्या संतापाचा स्फोट होण्यापूर्वी…”, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले, “तरुण म्हणून ‘या’ गोष्टीचा खेद वाटतो!”

रोहित पवार म्हणतात, “एक युवक म्हणून मला ‘या’ गोष्टीचा खेद वाटतो. सरकार कोणतंही असो…!”

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातून हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकमेकांना जबाबदार धरलं जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्प पुन्हा राज्यात येण्यासाठी प्रयत्न करण्याचे देखील दावे केले जात असताना त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे. तसेच, राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा संदर्भ देत एकनाथ शिंदे सरकारला गंभीर इशाराही दिला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून यासंदर्भात काही ट्वीट्स केले आहेत. या ट्विट्समधून त्यांनी राज्यातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘जिल्हा परिषदेच्या १३ हजार पदांची भरती कोरोनासह इतर कारणांनी तीन वर्षांपासून रखडली असताना आता या भरतीसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकालाही ग्रामविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलंय’, असं रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

‘युवकांना रोजगाराला मुकावं लागतंय’

‘याशिवाय आरोग्य, टेक्निकल व इतर विभागाच्या भरतीचीही अशीच अवस्था आहे. राज्यात येऊ घातलेले वेदान्त-फॉक्सकॉनसारखे उद्योग इतर राज्यात जात असल्याने तिथं उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधीला राज्यातील युवकांना मुकावं लागतंय’, असंही त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

‘युवक म्हणून याचा खेद वाटतो’

दरम्यान, देशात बेरोजगारीमुळे होणाऱ्या आत्महत्यांचा उल्लेख करत रोहित पवार यांनी त्यावर खेद व्यक्त केला आहे. ‘तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशात वर्षभरात १३ हजार युवकांनी आत्महत्या केल्या. रोज ३५ युवक आपली जीवनयात्रा संपवतात. यावर गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. सरकार कोणतंही असो, युवकांच्या प्रश्नांना बगल दिली जाते, ही वस्तुस्थिती असून एक युवक म्हणून या गोष्टीचा खेद वाटतो’, असं या ट्वीटमध्ये रोहित पवार म्हणाले आहेत.

हे वाचले का?  महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “यावेळी काहीतरी…”

रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा!

आपल्या ट्वीटमधून रोहित पवारांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे. ‘शासकीय नोकर भरतीलाही मुहूर्त मिळत नसल्याने राज्यातील युवा वर्ग निराशेच्या गर्तेत ढकलला जातोय. त्यामुळे तरुणांच्या संतापाचा स्फोट होण्यापूर्वी सरकारने ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी, ही विनंती’, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार