तासगावचा रथोत्सव उत्साहात; रथावर गणेशभक्तांकडून गुलाल, पेढय़ांची उधळण

निर्बंधमुक्त वातावरणामध्ये तासगावचा २४३ वा रथोत्सव गुरुवारी मोठय़ा उत्साहात साजरा झाला.

सांगली : निर्बंधमुक्त वातावरणामध्ये तासगावचा २४३ वा रथोत्सव गुरुवारी मोठय़ा उत्साहात साजरा झाला. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्रींची पंचधातूची मूर्ती असलेला रथ साधारण एक किलोमीटर अंतरावरील काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला निघाला. त्या वेळी गणेशभक्तांनी गुलाल, पेढय़ांची उधळण केली. या वेळी रथाचे सारथ्य मराठय़ांचे अखेरचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांचे वंशज राजेंद्र पटवर्धन यांनी केले. या रथोत्सवास दारूबंदी व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, खा. संजयकाका पाटील, राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित पाटील आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक  मान्यवर उपस्थित होते.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

रथोत्सवादिवशीच गणपती पंचायतन संस्थानच्या ऐतिहासिक दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होते. ’मंगलमूर्ती  मोरया, गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात, अलौकिक व नयनरम्य सोहळय़ात हा रथोत्सव पार पडला.  ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात भाविक गणरायाचा रथ दोरखंडाच्या साहाय्याने ओढतात.

 गणपती मंदिर ते समोर अर्धा किलोमीटरवर असलेल्या  काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत हा रथ ओढत नेला जातो. रथ ओढण्यास सुरुवात झाल्यानंतर  गुलाल व पेढय़ांची झालेली उधळण, युवकांनी रथासमोर केलेले मानवी मनोरे, झांज पथक, समोर दिमाखात चालणारी ‘गौरी’ हत्तीण यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. 

हे वाचले का?  पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

करोनामुळे तब्बल दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर यंदा तासगावात गणेशोत्सव आणि रथोत्सव सोहळय़ात मोठा उत्साह दिसून आला. मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी इ. स. १७७९ मध्ये तासगावच्या श्री सिद्धिविनायक गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून ही परंपरा अपवाद वगळता अखंड सुरू आहे.

रथोत्सव सोहळय़ात लाकडी कोरीव काम केलेला आणि लोखंडी चाके असलेला हा तीनमजली रथ भाविक दोराच्या साहाय्याने ओढतात. रथातून आणि रथाबाहेरून लाकडी ओंडक्यांच्या साहाय्याने रथावर नियंत्रण ठेवले जाते. या रथातून ’श्री गणेश’ पित्याच्या भेटीसाठी काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत जातात, तेथे आरती होऊन ते पुन्हा मंदिरात परततात, अशी आख्यायिका आहे.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले