तीन संशयितांकडून सात तलवारी जप्त ; काझी गढीतील घरात साठा

पोलिसांनी अमरधाम रस्त्यावरील काझीची गढी येथे जाऊन विपुल यास ताब्यात घेतले

नाशिक : अवैधरीत्या हत्यार बाळगणाऱ्या तीन संशयितांना शहर गुन्हे शाखा विभाग एकच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सात तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काझीची गढी येथे राहणारा विपुल मोरे आणि त्याचे साथीदार धारदार तलवारी बेकायदेशीररीत्या कुठून तरी आणून घरामध्ये लपवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अमरधाम रस्त्यावरील काझीची गढी येथे जाऊन विपुल यास ताब्यात घेतले. त्याला तलवारींविषयी विचारले असता मित्र चेतन गंगाणी, गणेश वाकलकर यांनी उज्जैन येथे जाऊन बेकायदेशीररीत्या सात तलवारी आणल्याची कबुली दिली. त्यापैकी चार तलवारी विपुलच्या घरात तर, दोन तलवारी गणेशच्या घरातून जप्त करण्यात आल्या. एक तलवार गंगावणीच्या घरात सापडली. पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. तिघांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीररीत्या धारदार तलवारी, प्राणघातक शस्त्र बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. नागरिकांनी अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या तलवारी बाळगू नये, आपला वाढदिवस किंवा इतर कोणताही कार्यक्रम साजरा करताना प्राणघातक शस्त्रांचा वापर करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा