“ते अमेरिकेतूनही समर्थन फॉर्म भरून घेतील” आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका!

सातारा दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिक, पदाधिकारी आणि जनतेची भेट घेत आहेत. दरम्यान, त्यांनी सातारा दौऱ्यावर असताना शिंदे गटावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. शिंदे गटाकडून साताऱ्यात समर्थन फॉर्म भरून घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली आहे.

“शिवसेना पक्षात झालेली गद्दारी लोकांना पटलेली नाही. गद्दारांना महाराष्ट्र कधीही क्षमा करत नाही. हे गद्दारांचं सरकार आहे. हे सरकार कोसळणार आहे, हे लोकांनाही माहीत आहे. प्रामाणिक लोकं जनतेला आवडत असतात, उद्धव ठाकरे हे प्रामाणिक असून जनतेच्या मनात बसलेला माणूस आहे” असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

शिंदे गटाकडून साताऱ्यात समर्थन फॉर्म भरून घेतले जात आहेत. शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय, याबाबत विचारलं असता, आदित्य ठाकरे म्हणाले की, “खोटं बोलायचं असेल तर ते काहीही बोलू शकतात. कदाचित ते उद्या अमेरिकेतूनही समर्थन फॉर्म भरून घेऊ शकतात, याला काही अंत नाही. मूळ गोष्ट ही आहे की, महाराष्ट्रात प्रामाणिकपणा आणि गद्दारी यातील फरक लोकांना माहीत आहे. ते आपल्याला येत्या निवडणुकीत दिसेल, निवडणुका लवकरच लागणार आहेत. कारण हे सरकार बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, गद्दारांचं सरकार आहे. भुकेपोटी स्थापन झालेलं हे सरकार आहे. हे सरकार कोसळणार आहे.”

हे वाचले का?  ”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”

त्यांनी पुढे सांगितलं की, प्रत्येक शिवसैनिक पुढे येत आहे आणि प्रामाणिकपणे काम करत आहे. शिवसैनिक म्हणून पुढे येत असताना ते लोकांची मदतदेखील करत आहेत. पण दुसऱ्या बाजुने केवळ राजकारण केलं जात आहे. राज्यात दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट आहे. सरकार स्थापन होऊन आज ३३ वा दिवस आहे. अद्याप त्यांना मंत्रिपदाच्या लायकीची तिसरी व्यक्ती सापडली नाही. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, हे त्यांनाही माहीत आहे. महाराष्ट्रात खरा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.