… ते मुख्यमंत्र्यांचं कौतुक की अब्रु काढणं हे अजित पवारच सांगू शकतात; भाजपा नेत्याचा टोला

करोनावर मुख्यमंत्र्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत असं म्हणाले होते अजित पवार

“करोनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत,” असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला.

“मुख्यमंत्र्यांनी करोनाचा एवढा अभ्यास केला की ते अर्धे डॉक्टरच झालेत, कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाही नाही. हे मुख्यमंत्र्यांचे कौतुक आहे की अब्रू काढणे आहे हे फक्त अजित पवारच सांगू शकतात. त्यांनी संजय राऊत यांच्याकडून धडे घेतलेले दिसतायत,” असं म्हणत भातखळकर यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

काय म्हणाले होते पवार?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांचा करोनावर इतका अभ्यास झाला आहे की करोना त्यांना झालाच नाही. आम्हाला सगळ्यांना झाला,” असं अजित पवार म्हणाले. “गंमतीचा भाग सोडा पण आपण करोना काळ असूनही खूप चांगलं काम केलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खूप चांगली वाटचाल करत आहेत. आपलं सरकार पडणार, तीन महिन्यात कोसळणार, सहा महिन्यात कोसळणार हे विरोधक म्हणत राहिले पण त्यांना हे सरकार पाडण्यात यश आलं नाही,” असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

हे वाचले का?  Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

“आता पुढची चार वर्षे महाविकास आघाडी सरकार हे यशस्वी आणि दमदार वाटचाल करेल यात माझ्या मनात काहीही शंका नाही. आपण एकजुटीने काम करतो आहोत यापुढेही आपल्याला असंच काम करायचं आहे. गेल्या वर्षभरात अनेक अडचणी आल्या. तरीही लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला,” असंही अजित पवार म्हणाले.