“तो म्हणतोय मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही”, मनोज जरांगेंचा रोख कोणाकडे?

मनोज जरांगे पाटील त्यांच्या साखळी आंदोलनादरम्यान राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून राज्यभर दौरे करत आहेत. मराठा आरक्षणासाठीचं उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांनी साखळी आंदोलन सुरू केलं आहे. उपोषण मागे घेताना त्यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर जरांगे पाटील आता राज्यभर मराठा आरक्षणासाठी जनजागृती करत आहेत. मनोज जरांगे यांच्या या साखळी आंदोलनादरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना लाखो लोकांची गर्दीदेखील जमत आहे. दुसऱ्या बाजूला, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात संघर्ष चालू आहे.

राज्यात ज्या मराठा कुटुंबांच्या गेल्या दोन-तीन पिढ्यांमधील कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन या मराठा कुटुंबांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार आहे. त्यास छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच हा विरोध करत असताना भुजबळ मनोज जरांगे यांना लक्ष्य करू लागले आहेत. भुजबळ हे मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर वैयक्तिक टीकादेखील करत आहेत. दरम्यान, आपलं आंदोलन राजकीय नसून मी आता छगन भुजबळांबद्दल बोलणार नाही असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी नुकतंच केलं आहे.

हे वाचले का?  धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण? ‘धनगड’ प्रमाणपत्रे रद्द; शिंदे समितीचा अहवाल सादर

साखळी आंदोलनादरम्यान, मनोज जरांगे यांची आज पुण्यातल्या खराडी येथे मोठी सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमच्या बापजाद्यांनी ज्यांना मोठं केलं, तेच लोक मोठे झाल्यावर आमच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. आमच्या बापजाद्यांची नेमकी इथंच चूक झाली. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच आमचा घात केला. मराठा समाजाने यांच्यासाठी राब राब राबायचं आणि यांना मोठं करायचं. आज मराठा समाजाची लेकरं टाहो फोडत आहेत. कोणीतरी आमचे मायबाप व्हा आणि आम्हाला आरक्षण द्या, अशी विनवणी करत आहेत. परंतु, हे लोक ऐकायला तयार नाहीत. मराठ्यांचा आक्रोश ऐकायला कोणीच तयार नाही.

हे वाचले का?  अनुसूचित जमातींमधून आरक्षणासाठी धनगर समाजाचे आंदोलन

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ज्यांना मराठ्यांनी मोठं केलं ते तरी मदतीला येतील ही मराठ्यांची आशा आता मावळली आहे. मराठ्यांनी आता मागे वळून बघितलं तर मदत करणारा पाठीमागे कोणीही नाही. ज्यांना-ज्यांना आपण मदत केली तेही पाठीमागे नाहीत आणि आपण समोर बघितलं तर ज्याला आपल्या बापजाद्यांनी यांना मोठं केलं, तो आपल्यासमोर उभा आहे. तो म्हणतोय की मी तुम्हाला आरक्षण मिळू देणार नाही. त्यामुळे मराठ्यांनो आतातरी सावध व्हा.

जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण मिळवण्याची अशी संधी मराठ्यांना यापुढे मिळणार नाही. आपल्या लेकराबाळांच्या न्यायासाठी संघर्षाची तयारी ठेवा. तुमच्या पायाला हात लावून विनंती करतो. लेकरांच्या पाठीवर शक्तीचं छत्र धरा. काही काळापूर्वी मराठ्यांची लेकरं मोठी होऊ नयेत यासाठी सगळ्यांनी विडा उचलला होता. या षडयंत्रात ते यशस्वी झाले. आता मात्र तुम्ही संघर्षाची तयारी ठेवा.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल