पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा होती. त्यावर आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नसल्याचे म्हटले आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले ऋणानुबंधही या मुलाखतीमध्ये उलगडून सांगितले. याच मुलाखतीमध्ये मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दलही भाष्य केले. “उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी त्यांना फोन केला होता. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन”, असे पंतप्रधान मोदी म्हणाल्यामुळे उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपाशी हातमिळवणी करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. याबाबत आता आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
द इंडियन एक्सप्रेस दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत अनेक विषयांवर आपली रोखठोक मते व्यक्त केली. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट यांचे आव्हान पेलत असताना शिवसेना उबाठा गट कसा प्रचार करत आहे. तसेच महाविकास आघाडीमधील उबाठा गटाची भूमिका काय? याबाबतही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले.
भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?
पंतप्रधान मोदींनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर शिवसेना-भाजपाबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी या चर्चेवर आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “भाजपाने निवडणुकीत केलेला प्रचार आणि त्यांचे वर्तन सर्वजण पाहत आहत. लोकशाही, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती त्यांच्या मनात किती द्वेष आहे, हेदेखील सर्वांना दिसत आहे. त्यांच्या मनात हा विखार जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवता येणार नाहीत.”
“उद्या पेगासस सारखे एखादे स्पायवेअर प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये असेल. आपल्या घरातील कॅमेऱ्यांचा एक्सेसही त्यांच्याकडे असेल. तुमच्यावर २४ तास पाळत ठेवली जाईल आणि तुम्हाला आवडणारे पदार्थ खाण्यापासून आणि आवडते कपडे घालण्यापासून रोखण्यात येईल. गेल्या काही काळापासून ज्याप्रकारे चीन लडाखमध्ये घुसखोरी करत आहे, त्यावर एक चकार शब्दही भाजपाकडून उच्चारला जात नाही. किंबहुना चीनप्रमाणेच एक पक्ष, एक शासन आणण्यासाठी भारत त्यांचे अनुकरण करत आहे”, असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांना तुम्ही पुन्हा तुमच्याकडे घेणार का? असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला सोडून गेलेल्या गद्दारांनी ज्याप्रकारे वर्तन केले. ते पाहता आता आमचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत.