तोफखाना दलास लवकरच २६४० अग्निवीरांचे बळ; पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू

उमेदवारांना पहिल्या १० आठवड्यात प्राथमिक लष्करी शिक्षण तर पुढील २१ आठवड्यात प्रगत लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे. आभासी पध्दतीने सराव करता येणाऱ्या आधुनिक प्रणाली अर्थात सिम्युलेटरचा वापर केला जात आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत निवड झालेल्या देशभरातील २६४० उमेदवारांना नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात कठोर लष्करी प्रशिक्षण दिले जात असून ३१ आठवड्यानंतर म्हणजे ऑगस्ट २०२३ मध्ये ही पहिली तुकडी तोफखाना दलात दाखल होणार आहे. यात उच्चशिक्षित युवकांचाही समावेश आहे. हिंदी अवगत नसणाऱ्यांना या भाषेचे शिक्षण देण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. पहाटे साडेपाच वाजता सुरू होणारा प्रशिक्षणार्थींचा दिवस रात्री १० वाजता संपतो. प्रशिक्षणात शस्त्रास्त्र चालविण्यासाठी फायरिंग तर लष्करी वाहने चालविण्यासाठी ड्रायव्हिंगच्या आभासी पध्दतीने सरावाकरिता सिम्युलेटरचा वापर केला जात आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत निवड झालेल्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणास नुकतीच तोफखाना केंद्रात सुरूवात झाली. या उमेदवारांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकात स्वागत करण्यात आले. अग्निवीरांच्या प्रशिक्षणासाठी केंद्रात जय्यत तयारी करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी , बायोमेट्रिक नोंदणीनंतर संबंधितांचा गुणांकनाच्या आधारे सर्वे, टीए, ऑपरेटर, गनर, चालक अशी पदनिहाय विभागणी केली गेली. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या बटालियनमध्ये त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तोफखान्याचे हे देशातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. केंद्राची एकाचवेळी साडेपाच हजार जणांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. मार्चनंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी उमेदवार येणार आहेत. केंद्रात अग्निवीरांना ३१ आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाईल. पहिल्या टप्प्यातील तुकडीचे प्रशिक्षण सहा ऑगस्ट २०२३ रोजी पूर्ण होईल. नंतर ते आपापल्या युनिटमध्ये दाखल होतील, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे वाचले का?  Nashik Crime : नाशिकमध्ये दुचाकीवर बसलेल्या तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

देशातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या उमेदवारांना बंधुभाव वृध्दिंगत करण्यासाठी मुख्यत्वे हिंदीचा वापर करण्याचा सल्ला दिला गेला. अनेकांना हिंदी भाषा फारशी अवगत नाही. त्यांच्यासाठी हिंदी भाषा शिक्षणाचे वर्ग सुरु करण्यात आले. अग्निवीर बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या योजनेमुळे लष्करात केवळ चार वर्ष सेवेची संधी मिळणार आहे. केवळ २५ टक्के अग्निवीर नंतर स्थायी सेवेत जाऊ शकतील. नागपूरच्या सचिन भोये या युवकाने भारतीय सेना ही नोकरी नाही तर, देशसेवेचा मार्ग असल्याचे नमूद केले. नोकरी कितीही वर्षाची असली तरी या माध्यमातून लष्करी सेवेची इच्छा पूर्ण झाली. रशियाशी लढणाऱ्या युक्रेनला नागरिकांना लष्करी प्रशिक्षण देऊन युध्दात पाठवावे लागत आहे. या योजनेमुळे भारतीय लष्करावर तशी वेळ येणार नाही. कारण, प्रशिक्षित अग्निवीर भविष्यात कधीही उपलब्ध असतील, अशी भावना त्याने व्यक्त केली. चार वर्षानंतर लष्करातील स्थायी सेवेत जाण्याचा बहुतेकांचा मनोदय आहे.

हे वाचले का?  Video: कसारा घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरची पाच मोटारींना धडक, १४ जण जखमी

दिवसभरातील प्रशिक्षणाचे स्वरुप

उमेदवारांना पहिल्या १० आठवड्यात प्राथमिक लष्करी शिक्षण तर पुढील २१ आठवड्यात प्रगत लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण दिले जावे म्हणून प्रशिक्षकांना आधी शिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणार्थींचा दिवस पहाटे साडेपाच वाजता सुरू होतो. विशिष्ट किलोमीटर धावल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करावा लागतो. नंतर बराच वेळ शस्त्रास्त्र प्रशिक्षण चालते. याकरिता आभासी पध्दतीने सराव करता येणाऱ्या आधुनिक प्रणाली अर्थात सिम्युलेटरचा वापर केला जात आहे. सायंकाळी मैदान गाठावे लागते. तिथे खेळण्यासाठी प्रशिक्षक उपलब्ध केलेले आहेत. पायाभूत सुविधा एकाच ठिकाणी असल्याने प्रशिक्षणास जास्त वेळ मिळतो. रात्रीच्या लष्करी कारवाईच्या प्रशिक्षणासाठी आठवड्यातून दोन दिवस सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ या वेळेत वर्ग होतात. उमेदवारांचा दिवस रात्री १० वाजता संपतो. दिवसभरात नाश्ता व भोजनाच्या वेळा निश्चित केलेल्या आहेत.

अग्निवीरांचा उत्साह वेगळाच

अग्नीवीर प्रशिक्षणासाठी प्रथमच दाखल झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. यातील बरेच जण उच्चशिक्षित आहेत. देशासाठी त्यांना काही करण्याची उर्मी असून ते जिद्दीने प्रशिक्षण घेत आहेत. देशाच्या बांधणीत त्यांचे अतिशय महत्वाचे योगदान राहणार आहे. मुळात अग्निवीर या नावात उत्साह आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिल्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आयोजित केला जाईल. लष्करात भरतीसाठी सध्या अग्निपथ ही एकच योजना राबविली जाते. याआधी नियमित भरतीत दाखल होणाऱ्यांना केंद्रात प्रशिक्षित करून सैनिक म्हणून तयार केले जात होते. अग्निवीरांमध्ये त्यांच्यापेक्षा वेगळा उत्साह दिसतो. सहा महिन्यानंतर जेव्हा ते आपल्या युनिटमध्ये जातील, तेव्हा सैनिक म्हणून ते अतिशय चांगली कामगिरी करतील, अशी माहिती नाशिकरोड येथील तोफखाना केंद्राचे कमांडंट ब्रिगेडिअर ए. रागेश यांनी दिली.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा