“त्यात काय, सामान्य माणसाच्या घरीही ४-५ कोटी सापडतात”, लाच प्रकरणात अडकलेल्या भाजपा आमदाराचं विधान चर्चेत!

लाच प्रकरणात अडकलेले भाजपा आमदार म्हणतात, “मला १०० टक्के खात्री आहे की या प्रकरणात मी निर्दोष सिद्ध होईन. माझ्या घरात सापडलेली रक्कम…!”

गेल्या आठवड्यात भाजपाचे कर्नाटकमधील आमदार मडल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही लाच विरुपक्षप्पा यांच्याच कार्यालयात स्वीकारली जात होती. त्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यातही कोट्यवधींचं घबाड सापडलं. यानंतर विरुपक्षप्पा गायब झाले होते. अखेर मंगळवारी न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर ते पुन्हा सगळ्यांसमोर आले. यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेत विरुपक्षप्पा यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

लोकायुक्त पोलिसांनी कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपाचे आमदार विरुपक्षप्पा यांच्या कार्यालयात त्यांचे पुत्र व्ही प्रशांत मडल यांना एका व्यावसायिकाकडून ४० लाखांची लाच घेतान रंगेहाथ अटक केली. ८१ लाखांचा सौदा असताना त्यातली ४० लाखांची लाच दिली जात होती. लाच देणाऱ्याच्या तक्रारीवरूनच हा छापा टाकण्यात आला होता. यानंतर विरुपक्षप्पा यांच्या घरी टाकलेल्या छाप्यातही जवळपास ६ ते ८ कोटींची रोख रक्कम सापडली होती. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवरच छापा पडल्याने या प्रकरणाची देशभर चर्चा झाली होती.

हे वाचले का?  Narendra Modi : मोदींचं पोलंडमध्ये मराठीतून भाषण! कोल्हापूर स्मारकाला भेट देऊन म्हणाले, “छत्रपती घराण्याने पोलिश महिला व मुलांसाठी…”

दरम्यान, हे सगळे पैसे व्ही प्रशांत विरुपक्षप्पा यांच्यावतीनेच स्वीकारत असल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यानंतर विरुपक्षप्पा गायब झाले होते. अखेर मंगळवारी न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिल्यानंतर ते सर्वांसमक्ष हजर झाले. यावेळी आपल्या घरी सापडलेले पैसे हे कौटुंबिक व्यवसायातून आल्याचं ते म्हणाले.

“माझा सुपारीचा व्यवसाय आहे, त्यामुळे…”

“मला १०० टक्के खात्री आहे की या प्रकरणात मी निर्दोष सिद्ध होईन. माझ्या घरात सापडलेली रक्कम लाचेच्या माध्यमातून जमा केलेली नाही. कौटुंबिक व्यवसाय आणि शेतीतून आलेला तो पैसा आहे. आमचा सुपारी उत्पादनाचा व्यवसाय आहे. माझ्याकडे सुपारीचं १२५ एकर शेत आहे. इतरही व्यवसाय आहेत. मी त्याचे पुरावे सादर करून माझे पैसे परत घेईन”, असं विरुपक्षप्पा म्हणाले आहेत.

हे वाचले का?  अनुसूचित जाती, जमातींतही ‘क्रीमिलेयर’ हवे; घटनापीठातील चार न्यायमूर्तींची महत्त्वाची सूचना

“घरी ६ कोटी सापडणं ही काही मोठी बाब नाही”

दरम्यान, यावेळी त्यांनी दिलेली एक प्रतिक्रिया चर्चेत आली. “चन्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुपारीचा व्यवसाय होतो. त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या घरीही ४-५ कोटी सापडू शकतात. आमचे खूप सारे व्यवसाय आहेत. त्यामुळे ६ कोटी ही काही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. मी यासंदर्भात लोकायुक्तांना योग्य ती कागदपत्र सादर करेन”, असं विरुपक्षप्पा म्हणाले आहेत.

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन