त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रमाणपत्र, अंनिसचा आक्षेप; दुकानदारांची नाराजी

दुकानदारांना काही हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ओम प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला असून त्याविषयी दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये भाविकांकडून अर्पण करण्यात येणाऱ्या प्रसादाचे पावित्र्य टिकविण्यासाठी परिसरातील दुकानदारांना काही हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ओम प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला असून त्याविषयी दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने यामागे प्रसादाचे शुध्दीकरण की सामाजिक विद्वेषीकरण करण्याचा प्रयत्न, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अंनिसने या चळवळीसंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. त्र्यंबकेश्वर येथे काही संघटनांकडून प्रसाद शुद्धीकरण चळवळ सुरु करण्यात आली आहे. मंदिराबाहेर मिळणाऱ्या प्रसादात अनेकदा भेसळ होत असल्याचे उघड झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे इतर सर्वच धार्मिक क्षेत्रांप्रमाणे धार्मिक क्षेत्राशी निगडित अनेक वस्तूंचा, खाद्यपदार्थांचा व्यवसाय ,व्यापार करणारी मंडळी ही विविध जाती, धर्माची आहेत. त्यामुळे विधर्मी व्यक्तीने मंदिराबाहेर प्रसादात भेसळ करण्याचे प्रकार घडल्याचे भंपक विधान करून सर्वच भाविक व व्यावसायिकांच्या मनात संशय व संभ्रम निर्माण करण्यासारखे आहे, अशी टीका अंनिसने केली आहे.

हे वाचले का?  नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

धर्माच्या नावाने कायदा हातात घेणाऱ्या अशा संघटनांच्या जाहीर कार्यक्रमांची वेळीच दखल घेऊन त्यांना कायद्याच्या कचाट्यात आणणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये ओम प्रमाणपत्र वितरणास सुरूवात झाली असून केवळ हिंदू व्यावसायिकांना हे प्रमाणपत्र दिले जात आहे. दुकानदारांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हे वाचले का?  अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात

प्रकरण नेमके काय ?

मुंबई येथील ओम प्रतिष्ठानच्या वतीने हिंदुंची धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी प्रसादाचे पावित्र्य राहण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्र वाटण्यात आले. या संस्थेच्या वतीने भाविकांना भेसळ नसलेला व शुध्द पदार्थांनी तयार केलेल्या प्रसादाचे वाटप अथवा विक्री होईल याची कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रसाद विक्रेते अथवा वाटपकर्ते यांना हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. रणजीत सावरकर, शरद पोंक्षे, महामंडलेश्वर अनिकेत शास्त्री देशपांडे आदींच्या उपस्थितीत या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यासंदर्भात सावरकर यांनी, प्रसाद व खाण्याच्या पदार्थांमध्ये गायीची चरबी अथवा बनावट तूप, रंग आदी मिसळून विक्री अथवा वाटप होऊ नये, याची सर्वत्र दक्षता घेतली जाणार असून विनाभेसळ शुद्ध प्रसाद देणाऱ्यांना प्रतिष्ठानतर्फे प्रशस्तिपत्र देण्यात येईल, असे नमूद केले.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

त्र्यंबकेश्वरमध्ये काही संघटनांकडून जे प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे, त्याच्याशी अन्न व औषध प्रशासन विभागाचा संबंध नाही. आम्ही केवळ विक्रेत्यांकडे खाद्य विक्रीचा परवाना आहे की नाही याची तपासणी करतो.