“थोरातांनी दुसऱ्यांचीच तळी उचलण्यात धन्यता मानली”; विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना टोला; म्हणाले, “थोडी तरी…”

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केलं. तसंच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करत टोला लगावला.

लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पुन्हा एकदा एनडीएचं सरकार सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. एकीकडे भाजपा पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा करत आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीही सत्ता स्थापन करेल, असा दावा केला जात आहे. मात्र, यासंदर्भात ४ जून रोजी चित्र स्पष्ट होईल. त्याआधी एक्झिट पोलवर नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया देत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केलं. तसंच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करत दुसऱ्याची तळी उचलण्यामध्ये ते धन्यता मानतात, असा खोचक टोला लगावला.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

“बाळासाहेब थोरात यांनी थोडी तरी लाज बाळगली पाहिजे. ते स्वतःला काँग्रेसचे नेते समजतात. मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये ते काँग्रेससाठी एकही जागा घेऊ शकले नाहीत. दुसऱ्यांची तळी उचलण्यामध्ये ते धन्यता मानतात. त्यामुळे त्यांची वैचारिक दिवाळखोरी यामधून सिद्ध होते. त्यांनी मदत केल्यामुळे नगर दक्षिणची जागा येईल, अशा या भ्रामक कल्पना आहेत. त्या तिघांनी भविष्यात स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करायला सुरूवात केली पाहिजे”, अशा खोचक शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

नगर दक्षिण लोकसभेबाबत काय म्हणाले?

“एक्झिट पोलसंदर्भात बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये महायुतीला यश मिळेल. एक्झिट पोल आल्यानंतर राजकीय विश्लेषक विश्लेषण करत असतात. या सर्वांना ४ जूनला उत्तर मिळेल. आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही जिंकणार हा विश्वास आम्हाला पहिल्यापासून होता. थोडा सोशल मीडियाचा परिणाम होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून विष पेरण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेचा कामावर विश्वास आहे. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वनेते आहेत. त्यांचा आशीर्वाद डॉ.सुजय विखे यांना होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचंही मार्गदर्शन आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

हे वाचले का?  CM Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंनी आधी उरली सुरलेली शिवसेना…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

नगर दक्षिण लोकसभेबाबत एक्झिट पोलचा अंदाज काय?

लोकसभेचे एक्झिट पोल १ जून रोजी समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, विविध मतदारसंघाबाबत वेगवेगळा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा कोण जिंकणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. एका एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते निलेश लंके हे जिंकतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर डॉ.सुजय विखे जिंकतील, असं महायुतीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कोण जिंकणार हे ४ जून रोजी स्पष्ट होईल.

हे वाचले का?  Maharashtra News Live : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण