ढिगाऱ्यांखाली जिवंत व्यक्ती सापडण्याच्या आशा मावळत चालल्या असल्या तरी बचावकार्य सुरू आहे.
तुर्कस्तान व सीरियातील विनाशकारी भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या ३० हजारांवर गेली आहे. ढिगाऱ्यांखाली जिवंत व्यक्ती सापडण्याच्या आशा मावळत चालल्या असल्या तरी बचावकार्य सुरू आहे. शनिवारी १२ जणांना वाचवण्यात यश आले.इब्राहिम झकेरिया नावाची व्यक्ती वारंवार बेशुद्ध पडत होती व शुद्धीवर येत होती. त्यांना ढिगाऱ्यांखाली ते किती दिवस होते, याचे भान नव्हते. झकेरिया यांची शुक्रवारी रात्री सुटका करण्यात आली.शनिवारच्या भूकंपानंतर वाचवलेल्यांत अंताक्यातील सात महिन्यांच्या बाळाचा आणि कहरामनमारस शहरातील एका कुटुंबाचा समावेश आहे.सीरियाच्या सीमेलगतच्या गझियान्तेप प्रांतातील नुरदागी शहरात इमारतीच्या ढिगाऱ्यातून पाच जणांच्या कुटुंबाची सुटका केल्याचे वृत्त ‘हैबरटर्कने दिले. इस्लाहिये गावात एक व्यक्ती व त्याच्या तीन वर्षांच्या मुलीला वाचवण्यात आले. हाताय प्रांतात सात वर्षांच्या मुलीची सुटका करण्यात आली.
इल्बिस्तानमध्ये २० वर्षीय मेलिसा उल्कू व आणखी एक व्यक्ती १३२ तासांनंतर ढिगाऱ्याखालून काढण्यात आली. ‘एनटीव्ही’च्या वृत्तानुसार हाताय प्रांतातील इस्केंदेरुनमध्ये १३८ तासांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४४ वर्षीय व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले. बचाव कर्मचाऱ्यांनी याला एक चमत्कार म्हटले आणि सांगितले की त्यांना येथे कोणीही जिवंत सापडेल, अशी अपेक्षा नव्हती. परंतु ते खोदत राहिले आणि त्यांना एका व्यक्तीचे डोळे दिसले. तो नाव पुटपुटत होता. त्याच प्रांतात १४० तासांनंतर एका मुलाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले.
सदोष बांधकामे : १३० जणांच्या अटकेचे आदेश
तुर्कस्तानचे उपाध्यक्ष फुआत ओकटे यांनी सांगितले, की इमारती सहज कोसळण्यास जबाबदार असल्याचा संशय असलेल्या १३१ लोकांच्या अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. न्याय मंत्र्यांनी सांगितले की, अशा लोकांना सोडले जाणार नाही.