दहा दिवसांत विद्यार्थ्यांची उपस्थिती जवळपास दुप्पट

करोना संसर्गामुळे राज्यभरातील शाळा जूनमध्ये सुरू होऊ शकल्या नाहीत.

पुणे : राज्यभरातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर गेल्या दहा दिवसांत सुरू झालेल्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लक्षणीय, तर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे आशादायी चित्र आहे.

करोना संसर्गामुळे राज्यभरातील शाळा जूनमध्ये सुरू होऊ शकल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देऊन संसर्ग कमी असलेल्या ठिकाणी शिक्षक गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या गटांना शिकवत होते. मात्र, दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेण्याचे निर्देश सरकारने दिले होते. त्यानुसार २३ नोव्हेंबरला राज्यातील २५ जिल्ह्य़ांतील ९ हजार १२७ शाळा सुरू झाल्या, तर २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थी उपस्थित होते. करोना संसर्गाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम होता.

हे वाचले का?  Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

दिवाळीनंतर करोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे अनेक पालकांनी काही दिवस प्रतीक्षा करणे पसंत केले. मात्र, करोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढल्याचे २ डिसेंबरच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ९१ हजार ९६२ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत आणखी २ हजार १९५ शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे राज्यभरात सुरू झालेल्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ११ हजार ३२२ झाली आहे.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

सहा जिल्ह्य़ांची आकडेवारी प्रलंबित

राज्यात नववी ते बारावीच्या २ लाख २२ हजार ४ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५६ लाख ४८ हजार २८ विद्यार्थी, २ लाख २७ हजार ७७५ शिक्षक, ९२ हजार ३४३ शिक्षके तर कर्मचारी आहेत. करोना संसर्गामुळे मुंबई, ठाण्यासारख्या काही ठिकाणी शाळा-महाविद्यालये २३ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने संकलित के लेल्या आकडेवारीमध्ये वर्धा, जळगाव, ठाणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई आदींची माहिती संकलित झालेली नाही.

गडचिरोलीत सर्वाधिक शाळा : राज्यात गडचिरोलीत सर्वाधिक शाळा सुरू झाल्या आहेत. गडचिरोलीत जवळपास ९८ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. त्यापाठोपाठ सोलापूरमध्ये ९५ टक्के शाळा सुरू झाल्या असून, तिथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ५० टक्के आहे.

हे वाचले का?  उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन