दहावी, बारावीसाठी सत्र परीक्षा? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात शिफारस

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाचा अंतरिम मसुदा गुरुवारी जाहीर केला

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे स्तोम कमी करण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुद्यात करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाच्या मसुद्यात परीक्षांचे नवे स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. दहावी आणि बारावी या महत्वाच्या टप्प्यांवरील मूल्यमापन हे फक्त वार्षिक परीक्षेच्या आधारे न करता सत्र पद्धत लागू करावी, तसेच बारावीच्या अंतिम निकालात अकरावीचे गुण विचारात घेण्यात यावेत, अशी शिफारस आराखडय़ात करण्यात आली आहे.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाचा अंतरिम मसुदा गुरुवारी जाहीर केला. त्यामध्ये अभ्यासक्रमांतील बदलांबरोबरच अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धतीतील बदलांचाही समावेश करण्यात आला आहे. दहावी म्हणजे माध्यमिक शालान्त परीक्षा आणि बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा या दोन टप्प्यांवर पुढील प्रवेश, विद्याशाखेची निवड अशा अनेक बाबी अवलंबून आहेत. त्यामुळे या परीक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे.

सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) विविध राज्य मंडळांमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा वर्षांअखेरीस घेण्यात येते आणि त्या एकाच परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीनुसार अंतिम निकाल जाहीर करण्यात येतो.

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी

नव्या शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम आराखडय़ात या परीक्षा पद्धतीत बदल सुचवण्यात आला आहे. नववी ते बारावी असा एकत्रित शैक्षणिक टप्पा विचारात घेण्यात येणार आहे.

बदल कधीपासून?

अभ्यासक्रम आराखडय़ाचा अंतरिम मसुदा जाहीर करण्यात आला आहे. इस्रोचे प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासक्रम आराखडा समिती नेमण्यात आली होती. या समितीने जाहीर केलेल्या या आराखडय़ावर सूचना, शिफारसी मागवण्यात आल्या आहेत. आलेल्या सूचनांचा विचार करून आनुषंगिक बदल करून अंतिम आराखडा जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे २०२४ पासून बदल लागू करण्याचे नियोजन आहे.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा