दिल्लीतील आंदोलनात आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सहभाग

२१ डिसेंबर रोजी नाशिकहून वाहनांसह निघून शेतकरी २४ तारखेला दिल्लीच्या सीमेवर पोहचतील

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.

२१ डिसेंबर रोजी नाशिकहून वाहनांसह निघून शेतकरी २४ तारखेला दिल्लीच्या सीमेवर पोहचतील. तीन वर्षांपूर्वी किसान सभेने नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढून देशाचे लक्ष वेधले होते. त्याच धर्तीवर नाशिक-दिल्ली वाहन मोर्चाचे नियोजन केले जात आहे.

हे वाचले का?  Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

या मोर्चाची माहिती किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावित, डॉ. अजित नवले यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील शेतकरी हरियाणा सीमेवर शहाजहानपूर येथे दिल्लीकडे जाणारा महामार्ग रोखून आंदोलनात सहभागी होतील. आपला शिधा, पाणी, निवासाची व्यवस्था सोबत घेऊन मुक्कामाची तयारी करण्यात आली आहे. रेल्वेची सामान्य वाहतूक बंद असल्याने इच्छा असूनही शेतकऱ्यांना दिल्लीला जाता आले नव्हते. वाहतुकीच्या अडचणींवर मात करत वाहनांद्वारे दिल्ली गाठणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल. त्याचे अनुकरण इतर भागातील शेतकरी करतील, असा विश्वास डॉ. ढवळे यांनी व्यक्त केला. सोमवारी राज्यातील शेतकरी वाहनांद्वारे नाशिक येथे जमतील. दिल्लीला कूच करताना रिलायन्स पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाहन मोर्चाचा पहिला मुक्काम नाशिकपासून ९० किलोमीटर अंतरावरील चांदवड येथे आहे. २२ तारखेला धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे मोर्चाचा दुसरा मुक्काम असेल. महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील हा तालुका आहे. २३ तारखेला मोर्चेकऱ्यांना मध्य प्रदेशची सीमा पार करता येईल की तिथेच अटकाव होईल, याबद्दल साशंकता आहे. मोर्चाच्या राज्यातील नियोजनाचा तपशील मांडताना गावित यांनी त्यास दुजोरा दिला.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”