दुष्काळी चांदवडला जलसंजीवनी

दुष्काळाच्या दरीत खितपत पडलेल्या चांदवड तालुक्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने देवसाने (मांजरपाडा) अभिनव प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला आहे.

पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पुणेगाव-दरसवाडीमार्गे येवल्यासह चांदवडमध्ये; छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

नाशिक : दुष्काळाच्या दरीत खितपत पडलेल्या चांदवड तालुक्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने देवसाने (मांजरपाडा) अभिनव प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला आहे. या भागाला अधिकचे पाणी मिळण्यासाठी पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पुणेगाव-दरसवाडीमार्गे येवल्यासोबतच चांदवडमध्ये देऊन हा दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

 चांदवड येथे पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आ. डॉ.राहुल आहेर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते. मांजरपाडा प्रकल्पाद्वारे पुणेगाव-दरसवाडी कालव्यातून चांदवड तालुक्यातील पाझर तलाव भरले जातील. गुजरातकडे वाहून जाणारे जास्तीत जास्त पाणी पार गोदावरी प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात वळविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यातून नाशिक जिल्ह्यासोबतच मराठवाडय़ाची तहान भागविली जाईल. पंचायत समितीची सुसज्ज इमारत उभी करण्यात आलेली आहे. या माध्यमातून पंचायत समितीचे कामकाज करण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील. नवीन इमारती बांधण्यासोबत त्यांना लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

हे वाचले का?  नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, स्काॅच ग्रुपतर्फे पुरस्काराने गौरव

चांदवड तालुक्यातील ६३ किलोमीटर आणि येवला तालुक्यातील ८८ किलोमीटर अंतरादरम्यान येणाऱ्या अनेक गावांना देवसाने प्रकल्पाचा फायदा होणार आहे. पुणेगाव कालव्याच्या गळतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. हथीयाड- राजदेरवाडी लघू पाटबंधारे योजना प्रस्ताव, काळडोह- केंद्राई धरणाच्या लगत नारायणगाव शिवारात स्थानिक नाल्याच्या स्रोताला मंजुरी, परसूल ते गंगावे पुणेगाव कालव्याची पाटचारी काढणे, ओझरखेड कालवा- वाहेगावसाळ गोई नदीपासून ते काजळी नदीपर्यंत वाढविणे यासोबत चांदवड तालुक्यातील इतरही सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहे. काही नव्याने मंजूर करावयाचे आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. दोन वर्षे अर्थचक्र थांबले असले तरी माणसे वाचविण्यासाठी आपण जास्तीत जास्त निधी देण्यास प्राधान्य दिले. आता कामकाजास सुरुवात झाली असून विकासाची कामे जलद गतीने करण्यात येतील असे ते म्हणाले. आमदार डॉ. आहेर यांनी पंचायत समितीची इमारत पूर्ण झाली असून फर्निचर, अन्य आनुषंगिक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस