देवराई, वनराई प्रकल्पांसाठी अर्थबळ हवे

संस्थेला समाजातील काही घटकांकडून मिळणाऱ्या मदतीचा ओघ करोना, टाळेबंदीमुळे आटला आहे.

चला, ‘आपलं पर्यावरण’ वाचवूया!

नाशिक : लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ‘आपलं पर्यावरण’ संस्थेने घालून दिला आहे. मात्र, वन विभागाच्या सहकार्याने सुरू झालेल्या देवराई, वनराई प्रकल्पाच्या वेगवेगळ्या कामांसाठी संस्थेला सध्या निधीची चणचण भासत आहे. आर्थिक समस्येमुळे संस्थेच्या चिमणी घरटे, पक्षी संवर्धन या उपक्रमांना घरघर लागली आहे.

शहराजवळील उघडेबोडके  होणारे डोंगर पाहून अस्वस्थ झालेल्या मनांचा हुंकार म्हणजे ‘आपलं पर्यावरण’ ही संस्था. फाशीचा डोंगर आणि म्हसरूळ येथील काही जमीन वन विभागाने ‘आपलं पर्यावरण’ला जंगलनिर्माणासाठी उपलब्ध करून दिली आहे. २०१५ मध्ये संस्थेने फाशीच्या  डोंगरावरील १०० एकरांपैकी ४० एकर जागेत देवराई फुलविण्यासाठी १० हजारांहून अधिक आणि म्हसरुळच्या ३५ एकरांपैकी १८ एकर जागेत २०१६ मध्ये वनराई निर्माणांतर्गत सहा हजारांहून अधिक झाडे लावली. याच ठिकाणी रानवेली तसेच झुडपांचे जंगलही आकारास येत आहे. संस्थेने पर्यावरण संवर्धनाचा घेतलेला ध्यास पाहता वेगवेगळ्या संस्थांकडूनही काही प्रमाणात मदतीचा हात पुढे के ला जात आहे. मात्र, या मदतनिधीतून गवत कापण्याचे यंत्र, पाणी उपसा करणारी मोटार, पाण्याच्या नळ्या, सुरक्षारक्षकाचा कक्ष यावर बराचसा खर्च होतो. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी संस्थेने संस्थापकांचे घर हेच कार्यालय अशी रचना के ली आहे. आर्थिक उत्पन्नाचा स्रोत वाढावा यासाठी संस्थेने २०१६च्या वन महोत्सवादरम्यान सदस्यत्व शुल्कासारखे वेगळे प्रयोग करून पाहिले, परंतु त्यांचा फारसा उपयोग न झाल्याने ते बंद करण्यात आले.

हे वाचले का?  पुरवठा विभागाचे कार्यालय अपंगांची नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर

संस्थेला समाजातील काही घटकांकडून मिळणाऱ्या मदतीचा ओघ करोना, टाळेबंदीमुळे आटला आहे. त्याचा परिणाम चिमणी घरट्यांचे मोफत वितरण, पक्ष्यांची देखभाल या उपक्र मांवर झाला. याशिवाय देवराई आणि वनराई फुलविण्यासाठी आणि संवर्धनासाठी मोठा खर्च येतो. त्याची पूर्तता कशी करायची, हा प्रश्न संस्थेला भेडसावत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास न थांबल्यास कोणकोणत्या प्रकारे नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागू शकते, हे गेल्या काही दिवसांत कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात घडलेल्या घटनांमुळे दिसून आले आहे. त्यामुळेच पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या संस्थांची जपणूक करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी संस्थेला मदतीसाठी सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर पुढे येण्याची गरज आहे.