महाराष्ट्र पोलिसांबाबात केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो, असं देखील म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आज (मंगळवार)विधानसभेत केला. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत, माझी खुशाल चौकशी करा, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असं म्हटलं. तसेच, माध्यमांशी बोलाताना, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने देखील निकाल दिला असल्याचं सांगत, याप्रकरणी मुंबई पोलिसांचं तोंड काळं झाल्याचं म्हटलं. यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
गृहमंत्री अनिल देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रावर इतका राग का आहे, हेच समजत नाही. यासंदर्भातील राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. परंतु त्यांचे आरोप हे संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करणारे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाचे संपूर्ण जगात नाव आहे. यामागे आम्हा कोणा राजकारण्याचे नव्हे तर पोलीसांचेच कर्तृत्व आहे. महाराष्ट्र पोलीस दलाला उज्वल परंपरा आहे. स्वत: फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने पोलीस दलाचे नेतृत्व केले आहे. पाच वर्षे याच पोलिसांनी त्यांना प्रशासन चालविण्यात, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात साथ दिली. त्यांचेच ‘थोबाड काळे झाले’ या प्रकारची भाषा हे वापरू कशी शकतात? आपल्या समाजाचे म्हणून काही आदर्श आहेत. सामान्य माणसाचा कायदा व सुव्यवस्थेवरचा विश्वास त्यामुळे टिकून आहे. क्षुद्र राजकारणासाठी आपण या पध्दतीचे आरोप करून सामान्य जनतेचा हा विश्वास डळमळीत करू नका असे मी फडणवीसांना आवाहन करतो.”
“अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मुंबई पोलिसांचं अक्षरश: थोबाड काळं झालं आहे. ज्यांनी तपास केला त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले आहेत. ते मला असं वाटतं गृहमंत्री विसरले आहेत. मुंबई पोलिसांपेक्षाही गृहमंत्री यांनी हा तपास पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना तो करारा जबाब आहे. पण मी तरी देखील त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. अन्वय नाईक प्रकरणात त्यांनी जरूर माझी चौकशी करावी. पण सोबत अन्वय नाईक यांच्या जमिनी कोणी विकत घेतल्या? याची देखील चौकशी त्यांनी करावी, हे माझं त्यांना खुलं आव्हान आहे.”असं फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
तर, “अन्वय नाईक प्रकरणाबाबत महाराष्ट्र पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. न्यायलयात देखील हा खटला सुरू आहे. पण मला अतिशय दुःख आहे की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन, त्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांचं तोंड काळं झालं, अशा पद्धतीनं वक्तव्यं केलं. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांनी पाच वर्षे राज्याचं मुख्यमंत्री व गृहमंत्री पद सांभाळलं. तेच आज महाराष्ट्र पोलिसांबाबात ज्या पद्धतीने बोलतात याचा मी आज निषेध करतो.” असंही गृहमंत्री देशमुख यांनी बोलून दाखवलं.