हैदराबादची स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे.
करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना एक चांगली बातमी आहे. हैदराबादची स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने काही अटींसह दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे. या चाचण्या ५ ते १८ वर्षांच्या मुलांवर केल्या जातील. देशात १० ठिकाणी चाचण्या केल्या जाणार आहेत. डीसीजीआयने विषय तज्ज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींच्या आधारे ही परवानगी दिली आहे. डीसीजीआयकडून मुलांवर चाचण्यांसाठी परवानगी मिळालेली बायोलॉजिकल ई ही चौथी लस आहे.
महत्वाचं म्हणजे सरकारने ३० कोटी लसींसाठी बायोलॉजिकल ई या कंपनीला १५०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम देऊन ठेवली आहे. दरम्यान, झायडस कॅडिलाची सुईमुक्त करोना प्रतिबंधक लसीला १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आपातकालीन परवानगी देण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिला आठवड्यापासून मुलांचं लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. तर, भारत बायोटेकच्या लहान मुलांसाठी कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचा निकाल या महिन्यात लागेल, असं म्हटलं जातंय.
भारतात लहान मुलांसाठीच्या चार लशी..
- झायडस कॅडिला
झायडस कॅडिलाच्या लशीला १२ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांवर वापरण्यास आपात्कालीन परवानगी देण्यात आली आहे.
- सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड
कोव्हिशिल्ड लसीच्या लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. ही लस २ ते १७ वर्ष वयोगटातील बालकांसाठी असेल.
- भारत बायोटेकची कोवॅक्सिन
कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून ही लस २ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांसाठी उपलब्ध असेल)
- स्वदेशी बायोलॉजिकल ई ची लस
काही अटींसह या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे. या चाचण्या ५ ते १८ वर्षांच्या मुलांवर केल्या जातील.