देशात २४ तासांत ३ हजार ९९८ रुग्णांचा मृत्यू; करोना रुग्णसंख्याही ४० हजारांच्या वर

गेल्या २४ तासांत देशात  ४२ हजार १५ नवीन करोना रुग्ण आढळले

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार होतांना दिसत आहे. काल मंगळवारी देशात गेल्या १२५ दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली होती. दरम्यान देशात पुन्हा एकदा करोना संक्रमित रुग्णांची संख्या ४० हजाराच्या वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात  ४२ हजार १५ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ३ हजार ९९८ रुग्णांचा करोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तसेच एका दिवसात ३६ हजार ९७७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात करोना संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या ३ कोटी १२ लाख १६  हजार ३३७ वर गेली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ४ लाख १८ हजार ४८० रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या ४ लाख ७ हजार १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आतापर्यंत देशात ३ कोटी ०३ लाख ९० हजार ६८७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. लसीकरणाने देखील देशात जोर पकडला आहे. देशात ४१ कोटी ५४ लाख ७२ हजार ४५५ लसीचे डोस देण्यात आले आहेत.राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. शिवाय, दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण करोनातून बरे देखील होत आहेत. मात्र असे जरी असले तरी देखील अद्यापही करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत रोज भर पडतच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही मागील काही दिवसांमध्ये करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ७ हजार ५१० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ६ हजार ९१० नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, आज १४७ करोनबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ६०,००,९११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आतापर्यंत १,३०,७५३ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू