मागील २४ तासांमध्ये ५५ हजार ७२२ नवे करोनाबाधित, ५७९ रुग्णांचा मृत्यू
जगभरातील थैमान घालणाऱ्या करोनाचा संसर्ग हळूहळू कमी जरी होत असला, तरी देखील देशात अद्यापही करोनाबाधित मोठ्या संख्येने आढळत आहेत. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ७५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ५५ हजार ७२२ नवे करोनाबाधित आढळले असून, ५७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५ लाख ५० हजार २७३ वर पोहचली आहे.
देशभरातील एकूण ७५ लाख ५० हजार २७३ करोनाबाधितांमध्ये ७ लाख ७२हजार ५५ अॅक्टिव्ह केसस, डिस्चार्ज मिळालेले ६६ लाख ६३ हजार ६०८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख १४ हजार ६१० जणांच्या संख्येचा समावेश आहे.
देशात १८ ऑक्टोबर पर्यंत ९,५०,८३,९७६ नमूने तपासल्या गेले. ज्यापैकी ८ लाख ५९ हजार ७८६ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने देण्यात आली आहे.
सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले गेले तर करोनाची साथ पुढील वर्षांच्या सुरुवातीपर्यंत नियंत्रणात येऊ शकेल, असे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने म्हटले आहे. आता जिल्हा किंवा राज्य पातळीवर टाळेबंदीची आवश्यकता नाही, असेही या समितीने स्पष्ट केले.