धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर विरोधक राजीनाम्याची मागणी करत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार योग्य निर्णय घेतील असं सांगत कौटुंबिक विषयात राजकारण करणं योग्य नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमाशी बोलत होते.

“हे आपण धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे. हा पूर्णपणे त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे. काय निर्णय घ्यावेत आणि काही नाही याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

“महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल तर तो भ्रम आहे,” असा टोला संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

“राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसात करु नये हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवल आहे. शरद पवारांनी सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

हे वाचले का?  Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ, महायुतीपुढची नेमकी आव्हानं काय?

कृषी कायद्यांवर केलं भाष्य –
“केंद्राला शेतकरी आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार आडमुठी वाटत आहे. त्यातून प्रश्न कसा सुटणार? शेतकऱ्याने सुप्रीम कोर्टात जाऊन कोणतीच मागणी केलेली नाही. कायदे रद्द करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जी समिती स्थापन झाली आहे त्यातील चारही सदस्य कालपर्यंत कृषी कायद्याचे समर्थक होते. त्यांच्याकडून कोणता न्याय मिळणार ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. सरकारनं जर एक पाऊल पुढे टाकलं तर आकाश कोसळणार नाही. केंद्र सरकार मजबूत आहे…त्यामुळे ते कोसळेल किंवा प्रतिमा मलीन होईल असं होणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण