धर्म संसदेत दावे-प्रतिदाव्यांसाठी सारे सज्ज; हनुमान जन्मस्थळाच्या वादावरुन रास्ता रोको; गोविंदानंद सरस्वतींच्या शोभायात्रेला परवानगी नाही

हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंधा यावरून साधू-महंतांमध्ये उफाळलेल्या वादावर मंगळवारी नाशिकरोड येथील महर्षि पंचायतन सिध्दपीठम येथे धर्मसंसदेत मंथन होणार आहे.

नाशिक: हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी की कर्नाटकातील किष्किंधा यावरून साधू-महंतांमध्ये उफाळलेल्या वादावर मंगळवारी नाशिकरोड येथील महर्षि पंचायतन सिध्दपीठम येथे धर्मसंसदेत मंथन होणार आहे. या धर्म संसदेत देशभरातील साधू, महंत काही प्रत्यक्ष तर, काही आभासी माध्यमातून सहभागी होणार आहेत. धर्मसंसदेसंदर्भात तयारी सुरु असतानाच अंजनेरीच्या समर्थनार्थ नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर ग्रामस्थांसह साधू, महंतांनी अचानक आंदोलन केले.

कर्नाटक येथील किष्किंधाचे मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी अंजनेरी ही हनुमान जन्मभूमी नसून किष्किंधा ही हनुमानाची जन्मभूमी असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला आहे. त्यांनी नाशिकच्या साधू, महंतांना अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे सिध्द करण्याचे आव्हान दिल्यानंतर या आव्हानाचा स्विकार करत नाशिकच्या साधू, महंतासह गावकरी एकत्र झाले आहेत. स्थानिक महंत आणि अभ्यासकांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा करीत पुराव्यानिशी सिद्धतेची तयारी केली आहे. हनुमानाच्या जन्मस्थळाबाबत गोविदानंद सरस्वती यांनी शास्त्रोक्त चर्चेचे दिलेले आव्हान अनेकांनी स्वीकारले आहे. धर्मसंसदेत विविध प्रांतातून महंत आणि अभ्यासक आभासी प्रणालीन्वये सहभागी होणार असल्याचे स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी सांगितले.

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

शासकीय पुराव्याद्वारे आपण अंजनेरीच हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे सिध्द करू शकतो. नाशिककरांना दिलेले आव्हान आपण स्वीकारल्याचे देवांग जानी यांनी म्हटले आहे. धर्मसंसदेत सहभागी होण्यासाठी गोविदानंद सरस्वती हे त्र्यंबकेश्वरहून आपल्या रथाद्वारे शोभायात्रा काढणार होते. तथापि, शहरात जमावबंदी लागू असल्याने त्यांच्या शोभायात्रेला परवानगी नाकारली गेली. दरम्यान, हनुमान जन्मस्थळाचा वाद तापला असताना साधू, महंत तसेच ग्रामस्थांनी सोमवारी अंजनेरी फाटय़ावर एकत्र येत नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर आंदोलन केले. अचानक झालेल्या रास्ता रोकोने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. हनुमानाचा जन्म अंजनेरी येथेच झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला.

हे वाचले का?  नाशिक: नियमबाह्य कामे केल्यास कारवाई; विभागीय सचिवांचा मुख्याध्यापक, प्राचार्यांना इशारा

भुजबळांकडून माध्यमांना कानपिचक्या

हनुमान जन्मस्थळावरून उद्भवलेल्या वादावर हे आपले क्षेत्र नाही, मी इतिहासाचा अभ्यासक नाही. असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांना कानपिचक्या दिल्या. महाराष्ट्रातील गावोगावी हनुमानाची मंदिरे आहेत. हनुमानजी सर्वाच्या मनात आहेत. आपण अंजनेरीला हनुमानाचा जन्म झाल्याचे म्हटले तर कोण काय करणार, शासनाचे शिक्कामोर्तब होणार आहे का, यावर साधू-महंत योग्य प्रकारे बाजू मांडतील. कुणी काही दावे केले तरी भाविक मंदिरात जाऊन पूजा करतील. प्रसारमाध्यमांनी कोणत्या विषयाला हवा द्यायची, याचा विचार करायला हवा. सध्या बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्ज मिळण्यात अडचणी अनेक विषय असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.