नजीकच्या काळात अंतराळ पर्यटन हे नित्याचे होणार !

जगातील संस्था नासा, स्पेसेक्स यासारख्या अंतराळ संस्थांनी चंद्रावर मानवी वसाहत निर्माण करण्याच्या दिशेने विविध प्रयोग सुरू केले आहेत.

वैज्ञानिक अविनाश शिरोडे यांचे प्रतिपादन

नाशिक : जगातील संस्था नासा, स्पेसेक्स यासारख्या अंतराळ संस्थांनी चंद्रावर मानवी वसाहत निर्माण करण्याच्या दिशेने विविध प्रयोग सुरू केले आहेत. त्यांना कमालीचे यश मिळाले आहे, एलन मस्क यांची स्पेसेक्स कंपनी तर २०३० पर्यंत एक लाख लोकांना चंद्रावर घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. म्हणजे नजीकच्या काळात अंतराळ पर्यटन ही नित्याची बाब होणार आहे. असे मत इस्रोचे माजी वैज्ञानिक अविनाश शिरोडे यांनी व्यक्त केले.

हे वाचले का?  Lockdown Effect on Moon : पृथ्वीवरील ‘कोविड लॉकडाउन’मुळे चंद्राच्या तापमानात घट; अभ्यासातील निष्कर्ष

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष आणि विज्ञान मंडळ या विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्याच्या उदघाटनप्रसंगी शिरोडे यांनी मार्गदर्शन केले. शिरोडे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देतांना भारतीय अंतराळ संस्थेची माहिती दिली.

अंतराळ विज्ञानमध्ये इस्रो या संस्थेने केलेले कार्य आणि भारताने राबविलेल्या चांद्रयान मोहिमा याचीही माहिती दिली. अंतराळ मोहिमांमध्ये काम करताना प्रचंड खर्च त्या देशाला करावा लागतो. या कारणामुळे अमेरिकेसारख्या देशानेही आपले चांद्रयान प्रकल्प काही काळासाठी बंद ठेवले होते, परंतु, भारतीय अंतराळ संस्थांनी मात्र सर्वात कमी खर्चात या चांद्रयान मोहिमा पूर्ण केल्याने जगानेही त्यांची नोंद घेतली. बरेच प्रगत देश आपले उपग्रह अवकाशात पाठविण्यासाठी भारताची अंतराळ संस्था इस्रोची मदत घेत असतात, असे शिरोडे यांनी सांगितले.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?

डॉ.  एपीजे अब्दुल कलाम, डॉ. विक्रम साराभाई यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव वेगवेगळय़ा प्रसंगातून त्यांनी मांडला. प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी महाविद्यालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय डॉ. एन. यु. पाटील यांनी करून दिला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. भगवान कडलग, विज्ञान मंडळ प्रमुख डॉ. ए. एम. भगरे, इलेक्ट्रोनिक्स विभागप्रमुख प्रा. बी. के. आहेर आदी उपस्थित होते.