नटसम्राट म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, “कोणी खूर्ची देतं का खूर्ची…”

फडणवीसांनी संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा एक आणि संध्याकाळी एक बोलतात अशी टीका केली आहे

आम्हाला नटसम्राट म्हटल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी नाही असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीसांनी संजय राऊत हे नटसम्राट असून दिवसा एक आणि संध्याकाळी एक बोलतात अशी टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी त्यांच्या या टीकेला उत्तर दिलं.“नटसम्राट हे महाराष्ट्राचे फार मोठे वैभव आहे आणि गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा असल्याचं त्यांना माहिती नाही. महाराष्ट्रातील सगळे नटसम्राट गोव्यातूनच गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. त्यामुळे नटसम्राटची खिल्ली उडवून ते गोव्यातील जनतेचा, रसिकजनांचा आणि नाट्यकर्मींचा अपमान करत आहेत,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “नाटकात कोणी घर देता का घर असं एक वाक्य आहे. तशीच फडणवीसांची मला कोणी खूर्ची देतं का खूर्ची अशी अवस्था आहे”.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका

“नटसम्राट म्हणाल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत. गोव्याने मराठी रंगभूमी संपन्न केली. नटसम्राट म्हणाल्याचा आम्हाला आनंद आहे, पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी नाही,” असा टोलाही यावेली त्यांनी लगावला.

मनोहर पर्रिकरांसंबंधी संजय राऊत यांनी आजारी असताना केलेल्या उल्लेखाची आठवण करुन देताना मगरीचे अश्रू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “तेव्हा पर्रिकर सक्रीय नव्हते. याचा अर्थ त्यांच्या बाबतीत काही दुर्दैवी घटना व्हावी अशी आमची भूमिका नव्हती. आम्ही इतके निर्देयी नाही. त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी आम्ही प्रार्थना करत होतो. उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यायचं की नाही हा भाजपाचा प्रश्न आहे. पण जर ते अपक्ष राहिले तर त्यांच्याविरोधात उमेदवार द्यायचा की नाही याबाबत विचार केला पाहिजे. शिवसेना नक्की विचार करेल”.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : मराठा ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त

“पर्रिकरांच्या कुटुंबाविषयी असणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. याच्या पलीकडे भाजपाच्या यादी, उमेवारांशी किंवा निवडणुकीशी काही संबंध नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवावी,” असंही ते म्हणाले.