नांदगावमध्ये अतिवृष्टी

सलग तीन महिन्यांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली.

नाशिकसह मालेगाव तालुक्यातही जोर

नाशिक : सलग तीन महिन्यांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली. नांदगाव परिसरात एकाच  दिवसात १२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नांदगाव शहरातून वाहणाऱ्या शाकंभरी आणि लेंडी नदीला पूर आल्याने मुख्य चौकातील दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले. साकोरे-नांदगाव रस्त्यावरील मोरखडी बंधारा फुटला. नदीवरील पुलांवर पाणी आल्याने मनमाड, औरंगाबादकडे जाणारी वाहतूक थांबवावी लागली. मालेगाव,  सुरगाणा, येवला, निफाड, बागलाण, पेठ या भागात पावसाचा जोर वाढला आहे.

राज्यातील अनेक भागात पाऊस दमदार हजेरी लावत असताना नाशिक त्यापासून दूर राहिला होता. ही कसर आता भरून निघण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात ६२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नांदगावसह परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. शाकंभरी आणि लेंडी नदीला रात्री पूर आल्याने नांदगाव शहर परिसरात हाहाकार उडाला.

पुरात काठालगतच्या गुलजारवाडी, पांचाळ गल्ली, भोंगळे रस्ता आदी भागातील घरांतील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. गांधी चौक, फुले चौक, आंबेडकर चौकातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले. परिसरातील लाकडी, लोखंडी टपऱ्याही वाहून गेल्या. नगराध्यक्ष राजेश कवडे, प्रांताधिकारी  सोपान कासार , तहसीलदार दीपक पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दोन्ही नद्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रात्री अकरा वाजता मालेगाव, औरंगाबादकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. रात्री दोन वाजता पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. साकोरे-नांदगाव रस्त्यावरील मोरखडी बंधारा  फुटला. उभ्या पिकात पाणी शिरल्याने शेतीचे नुकसान झाले. रस्ता वाहून गेल्याने १५ गावांचा संपर्क सुटला आहे. मोरझर भालूर, दहेगाव आदी धरण क्षेत्रात बुधवारी पाऊस सुरू असल्याने पुन्हा पुराचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

महापुराची दहा वर्षांनी पुनरावृत्ती

गावात पाणी शिरत असल्याची बातमी नांदगावकरांना कळली. प्रत्येकाने आपल्या दुकानाकडे धाव घेतली. मात्र लेंडी व शाकंभरी नदीचे रौद्ररूप बघून नागरिक थबकले. होत्याच नव्हतं झालं. सारं काही डोळ्यादेखत वाहून गेलं. ना दुकाने राहिली ना दुकानातील साहित्य. काही हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांनी नदीच्या काठाला चार पर्त्यांचा छोटासा संसार उभारला होता.तोही पत्त्याच्या डावाप्रमाणे कोसळला. अशी बिकट अवस्था नांदगाव शहरातील गुलजारवाडी, पांचाळगल्ली, गांधी चौक, आंबेडकर चौक, फुले चौक येथील रहिवाशांची व दुकानदारांची मध्यरात्री आलेल्या पुराने झाली. महापुराच्या घटनेची दहा वर्षांनी पुनरावृत्ती झाली.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

रेल्वे रुळांवर पाणी

मध्यरात्री नांदगाव रेल्वे स्थानकावर तीन ते चार फूट पाणी होते. त्यामुळे  रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. पंजाब मेल, आझाद हिंदू व विदर्भ एक्स्प्रेस या गाड्यांना रेल्वे स्थानकापासून दूर उभे करण्यात आले. तर या वेळेत धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्यांना मनमाड व चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले. प्रवासी रेल्वे गाड्या १५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या.

इतर तालुक्यांत जोर वाढला

जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. सुरगाणा (६९), सिन्नर (५४), येवला (५१), पेठ (४६), निफाड (५३), मालेगाव व कळवण (प्रत्येकी ३३), िदडोरी (२९), इगतपुरी (२१), चांदवड (१७), नाशिक (१६), देवळा (१५), त्र्यंबकेश्वर (२२) मिलीमीटर पाऊस झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

पिकांचे नुकसान

मालेगावसह परिसरात एक महिन्याच्या खंडानंतर पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने कांदा लागवडीच्या कामास गती आली. मात्र काही भागात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मका,बाजरी व लागवड केलेल्या कांद्याचे पिके खराब होऊ लागली आहेत. तसेच बुरशीजन्य आजारांमुळे कांद्याचे तयार रोपे देखील मोठ्या प्रमाणावर खराब होत असल्याची शेतकऱ्यांची ओरड सुरू झाली आहे. बुधवारी पहाटे  निमगाव परिसरातील साकुरी,जेऊर पाथर्डी,िनबायती जाटपाडे आदी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे १३ घरे व एक जनावरांचा गोठा पडला. तसेच २१४ शेतकऱ्यांचे २७५ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.