नामसाधर्म्य असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मारहाण; नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला वादाचे ग्रहण

 विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या अन्य उमेदवाराने अर्ज दाखल करू नये, माघार घ्यावी, यासाठी दबावतंत्राचा अवलंब करीत धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात घडली.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या अन्य उमेदवाराने अर्ज दाखल करू नये, माघार घ्यावी, यासाठी दबावतंत्राचा अवलंब करीत धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात घडली. यावेळी शिवसेना शिंदे गट-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी परस्परांविरोधात घोषणाबाजी केली. या निवडणुकीसाठी ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले आहेत.

हे वाचले का?  नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

शिक्षक मतदारसंघात अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपुष्टात आली. याच दिवशी महायुतीत जागा वाटपाचा घोळ मिटला. शिवसेना शिंदे गट ही जागा लढविणार असल्याचे निश्चित झाले. गतवेळचे शिवसेना पुरस्कृत आमदार किशोर दराडे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेनेच्या एबी अर्जासह पुन्हा अर्ज दाखल केला. या जागेवर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार दराडे आणि ठाकरे गटाचे उमेदवार अॅड संदीप गुळवे यांच्यात लढत होणार आहे. शिंदे गटाच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असणारे कोपरगावचे किशोर प्रभाकर दराडे यांनीही अर्ज दाखल केल्यावरून उपरोक्त वाद झाला.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नाव साधर्म्य व काहिशा समान चिन्हामुळे अपक्ष उमेदवार बाबू भगरेंनी एक लाखहून अधिक मते मिळवली होती. त्याचा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांना बसला. त्यांचे मताधिक्य घटले.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

शिक्षक मतदारसंघात तसेच डावपेच आखले जात असल्याचे पाहून आ. किशोर दराडे यांच्यासह समर्थकांनी दबावतंत्राचा प्रयोग केल्याचे सांगितले जाते. आपण अर्ज दाखल करू नये, यासाठी दबाव टाकून धक्काबुक्की केल्याचे राष्ट्रीय जनक्रांती पक्षाचे उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांनी माध्यमांना सांगितले. आपण निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात हा गोंधळ झाला. पोलिसांना धाव घ्यावी लागली. या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी उपरोक्त घटनेशी आपला व कार्यकर्त्यांचा कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला.